Ashadhi Wari Toll Free : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र ही टोलमाफी कागदावरच असल्याचा अनुभव अनेक वारकऱ्यांना आला. याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यानंतर शिंदे सरकारने तातडीने पावले उचलली. आता वारकऱ्यांच्या वाहनाचे टोल माफ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसामार्फत स्टिकर्स लावले जात आहेत. या स्टिकर्सवर वारकऱ्यांच्या प्रवासाचा पूर्ण तपशील असेल. तसेच पंढरपूरला जाताना आणि परत येणातानेच टोल माफ होणार आहेत. शिंदे सरकारने तातडीने निर्णय घेतल्यामुळे वारकऱ्यांही या निर्णायाचं स्वागत केलेय.


पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे आवश्यक असून त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे  तसेच संबंधित पोलीस स्टेशन येथे सुविधा करण्यात आली आहे.  पंढरपूरला जाताना आणि येताना १५ जुलै २०२२ पर्यंत या कालावधीत पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनासाठी ही सुविधा असेल. संबंधितांनी वाहन क्रमांक, चालकाचे नावासह अर्ज करून पास प्राप्त करून घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.


पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल नाक्यावर अडवू नये , अन्यथा कारवाई होईल - 
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तरीही टोल नाक्यावर टोल वसूल केला जात असल्याचे अनेक फोन मला आले आहेत. त्यामुळे मी टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आवाहन करतो की वारकऱ्यांना त्रास न होता त्यांची वाहने जाऊ द्यावीत. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. 


दरम्यान, शुक्रवारी अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.  त्यामुळे वारकऱ्यांना देण्यात आलेली टोलमाफी कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला होता. सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांत याच्या बातम्या तात्काळ प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर तात्काळ वारकऱ्यांची टोलमाफी सुरु केली आहे.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे? - 
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा  आज आढावा घेतली.  सर्व अधिकारी , पोलीस, पंढरपूर मंदिर समिती यांच्या सोबत आढावा घेतला आहे. यंदाच्या एकादशीचे अतिशय चांगले नियोजन केलेले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे यावर्षी वारकऱ्यांच्या  संख्येत वाढ होणार आहे याचा विचार करून नियोजन केलेले आहे. व्हीआयपी व्यक्तीपेक्षा वारकरी महत्त्वाचे आहे, त्यांचे संरक्षण केले पाहिजे.  वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. एसटीने चार हजार बस सोडल्या आहेत. गरज पड्यास अधिक बस सोडण्यास एसटी महामंडळाला सांगितले आहे.


10 जुलैला आषाढी एकादशी - 
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. आता सर्व पालख्या पंढरपूरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. अनेक वारकरी थेट एकादशीदिवशी पंढरपुरात पोहोचतात.