मुंबई : राज्यात बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी 11 ते 2 च्या दरम्यान आज इंग्रजी विषयाचा पहिला पेपर पार पडला. राज्यातील नऊ विभागातील एकूण 14 लाखांच्या वर विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी अर्ज केला होता. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेसाठी राज्यात 2957 परीक्षा केंद्रे आहेत. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही आज परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. तसेच कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण 9771 कनिष्ठ महाविद्यालयातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी तर 6 लाख 48,151 विद्यार्थिनी परीक्षा देत आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात 2957 परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.

बेस्टकडून विशेष सवलत
बेस्ट बसकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. बेस्टने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी परीक्षेचे हॉलतिकीट दाखवून परीक्षा केंद्रापर्यंत प्रवास करु शकतात. तसंच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजाने गाडीत प्रवेश करण्याची मुभाही देण्यात आली आहे.