गोंदिया : कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नववी आणि दहावीच्या शाळा आता कुठे पुन्हा सुरु झाल्या असताना बहुतांश जागी पहिले ते आठवीच्या शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. दरम्यान गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या भूमी बंग हीने आपल्या घरातल्यांकडे "मला शाळेत जाऊ देना" असा हट्ट धरला. ज्यांनंतर ती ऐकत नसल्याने अखेर आईने चिमुकलीला गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचा मोबाईल क्रमांक मिळवत थेट फोन लावून दिला. ज्यानंतर भूमीने नयना यांना 'आमची शाळा सुरु करा' अशी मागणी केली आहे. ज्यानंतर नयना यांनी भूमीच्या विनंतीला मान देत एका आठवड्यात शाळा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.


भूमी ही गोंदिया जिल्हा परिषदेच्या भांगी जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिक्षण घेते. ती देवरी शहरातील उद्योगपती मीथुन बंग यांची मुलगी असून तिला दोन भावंड आहेत. दरम्यान भूमी मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असून कोरोनाच्या संकटामुळे भूमीची शाळा ऑनलाईनच भरत आहे. पण अशातच ग्रामीण भागात इंटरनेटही हवे तसे उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येतात. त्यात लगतच्या भंडारा जिल्ह्यात नुकतेच पहिले ते आठवीचे वर्ग सुरु झाल्याने आता आपलीही शाळा सुरु करावी अशी मागणी गोंदियातील भूमीने केली आहे.


'शनिवार-रविवारीही शाळा सुरु ठेवा'


मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत पण अभ्यासक्रम भरुन काढण्याचं शिक्षकांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. यावरुन आता शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरु ठेवून अभ्यासक्रम भरुन काढला पाहिजे, असं आवाहन राज्यातील शिक्षकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी हे आवाहन केलं  आहे.


इतर महत्त्वाचे बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha