Anil Parab on St Workers Strike : संपातून कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची अडवणूक केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीबाबत उच्च न्यायलयाची समिती जो निर्णय देईल त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 


राज्य सरकारने, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली. त्यानंतर संप मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील विजय मिळवला असून पुढील निर्णय पूर्ण विचार करून घेण्याचे आवाहन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली वेतन वाढ आणि भाजप नेत्यांनी घेतलेली माघार यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन महामंडळाने केले होते. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत होईल अशी अटकळ बांधली जात होती. राज्यात काही ठिकाणी पोलीस संरक्षणात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. 


या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरात लवकर मिटेल असा विश्वास व्यक्त केला. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि पगार वेळेवर व्हावा यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे नोकरीच्या शाश्वतीची मागणी सरकारने मान्य केली असल्याचे परब यांनी सांगितले. निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी आज सायंकाळपर्यंत कामावर पुन्हा रुजू झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


...तर कारवाई होणार
 
औद्योगिक न्यायलयाने संप बेकायदेशीर ठरवल्यास एसटी महामंडळाच्या तरतुदीनुसार, एक दिवसाच्या संपासाठी आठ दिवसांचा पगार कापण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लवकर कामावर रुजू व्हावे, कारवाई करण्यास महामंडळाला भाग पाडू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले. एसटीचे होणारे नुकसान हे राज्याचे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. 


लालपरी धावली


वेतनवाढ आणि सरकारने कामावर परतण्याचा दिलेल्या अल्टिमेटमनंतर संपकरी एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. त्यामुळे राज्यात विविध आगारामधून एसटी धावू लागल्या आहेत. कोल्हापुरातून तब्बल 18 दिवसानंतर एसटी धावली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही एसटी इचलकरंजीच्या दिशेने रवाना झाली. तिकडे वसई आगारातूनही लालपरी धावली आहे. एसटी पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय. जवळपास दहा हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकारने केला आहे.