St Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्याप सुरुच आहेत. आज या संपाला एक महिना पूर्ण झाला. प्रशासनानं दिलेल्या पगारवाढीच्या आश्वासनानंतरही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. 8 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन मुख्य मागण्यांसाठी एल्गार पुकारला. एसटी कर्मचाऱ्यांचा इतिहासातील पहिलाच दीर्घकालीन संप असल्याचं बोललं जातंय. एस.टी. महामंडळाच्या 61 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासातील इतके दिवस चालणारं हे विक्रमी आंदोलन ठरलं आहे. आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाला आंदोलनामुळे थोडा थोडका नाहीतर तब्बल 450 कोटींहून अधिक फटका बसला. 


8 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आणि अघोषित काम बंद आंदोलन सुरु झालं. राज्यभरातील सर्वच एसटी डेपोमधील एसट्यांची चाकं थांबली. वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन प्रमुख मागण्यांवर कर्मचारी ठाम होते. त्यासाठी सरकारसोबत बैठकांच्या फैरी जडल्या. संपूर्ण राज्यभरातून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. तसेच विरोधकांनीही एसटी संपाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं. अखेर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. गेल्या एक महिन्यापासून अनेक टप्प्यांमधून हे आंदोलन गेलं. जाणून घेऊया आंदोलनातील महत्त्वाचे टप्पे... 


एसटी संपाचे 30 दिवस... 



  • 8 नोव्हेंबर : कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला सुरुवात

  • 9 नोव्हेंबर : मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन

  • 12 नोव्हेंबर : आझाद मैदानावरील आंदोलनात भाजप नेत्यांचा सहभाग

  • 24 नोव्हेंबर : परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून पगारवाढीचा निर्णय जाहीर

  • 8 डिसेंबर : संपाला एक महिना पूर्ण 


एसटी संपावर तोडगा काढत सरकारनं 24 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा निर्णय जाहीर केला. सरकारने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांपैकी 9910 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तर रोजंदारीवरील 2014 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली. अशातच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना पूर्ण होत असताना राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर कामगार ठाम आहेत. सरकारने 'मेस्मा' कायद्याद्वारे 12 हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून सरकार आणि संपकऱ्यांतील संवाद संपुष्टात आला आहे. दरम्यान, 20 डिसेंबरला या प्रकरणातील न्यायालयीन आदेशाकडे संपकऱ्यांचे डोळे लागले आहेत.


इतिहासातील पहिलाच दीर्घकालीन संप


एसटी महामंडळाच्या स्थापनेपासून महिनाभर प्रदीर्घ काळ चाललेला हा ऐतिहासिक संप ठरला आहे. 1972 मध्ये 15 दिवसांचा संप झाला होता. त्यानंतर चार दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेला हा पहिलाच संप आहे. याआधीही एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वेतनवाढीसाठी संपाचे आंदोलन छेडावे लागल्याचा महामंडळाचा इतिहास आहे. पाहुयात यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनं. 



  • 1972 मध्ये 15 दिवसांचा संप झाला

  • 2007 मध्ये मॅक्सी कॅबच्या विरोधात एक दिवसाचा संप झाला

  • ऑक्टोबर 2017 मध्ये चार दिवसांचा संप झाला होता

  • जून 2018 मध्ये सातव्या वेतनासाठी संप केला


देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा युट्यूब लाईव्ह