Nawab Malik vs Devendra Fadnavis : हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी 10 वाजता लवंगीही लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यात हात पोळले आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल इतकी होती की, त्यांना हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागेलं, असं वाटलं, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. 


मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे अशी अनेक नावं घेऊन त्यांनी खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरुर त्यांनी केला, पण तो विफळ ठरला. याचा कारण देवेंद्र फडणवीसांशी जोडणं याचा प्रयत्न नवाब मलिकांनी केला, पण त्यात सत्य नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा आशिष शेलारांनी केलाय. संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा तिनही पक्षांनी एकत्र लावूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांवर चिकटणारा तर सोडाच, पण लागू शकेल असा आरोपही मलिक करु शकले नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले. 


गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा : आशिष शेलार 


"हो हे खरंय. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफत हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या कायदेशीरपणे नेमणूका झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण ते स्वतः करतील. मला माहीत असलं तरी यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कनेक्शन ते स्वतःच सांगतील. हे सगळं सोडलं तर गेल्या दोन वर्ष तुमचं सरकार आहे. विशेषतः तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडे गृहमंत्री पद आहे. आज तुम्ही ज्यांच्यावर गंभीर आरोप करताय. त्या हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर गेल्या दोन वर्षांत एक साधा अदखलपात्र गुन्हाही नोंद करु शकला नाही. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कोणताही गैरप्रकार देवेंद्र फडणवीसांच्या काळात झाला नाही." , असं आशिष शेलार म्हणाले. 


"ज्या पद्धतीनं आरोप केला त्यातलं सत्य हे आहे की, त्या प्रकरणात पकडला गेलेला इमरान आलम शेख हा हाजी अराफतचा भाऊ होता. तो काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाले, त्याला अटक झाली त्यावेळी तो काँग्रेसचा सचिव होता. आणि आता ज्यावेळी मलिक आरोप करत आहेत, त्यावेळी तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हाजी हैदर स्वतः पत्रकार परिषदा घेणार आहेत. गेल्या 2 वर्षांत बांग्लादेश सोडाच मुंबईतील कोणत्याही भागात त्यांनी कोणता गुन्हा केल्याचीही नोंद नाहीये. त्यामुळे सामान्य माणसांना फसवण्याचा, लटकवण्याचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा धंदा आहे, त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप करण्याचा प्रयत्न मलिकांनी केला."


"मलिकांनी रियाझ भाटीचा उल्लेख केला. आम्ही स्पष्ट करतो की, पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधान कार्यक्रम याच्याशी रियाझ भाटी यांचा काहीही संबंध नाही. तसेच फोटोवरुनच संबंध प्रस्तापित करण्याचे असतील. तर आमच्याकडेही काही फोटो होते. मी दाखवणार नव्हतो पण...", असं म्हणत आशिष शेलार यांनी काही फोटो दाखवले.