ST Workers Strike Live Updates : लालपरीला ब्रेक! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन तापलं, वाचा प्रत्येक अपडेट
Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. यामुळं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे
न्यायालयानं जो समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला आहे. त्याचं आम्ही पालन करु, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती. आम्ही समिती स्थापन करु. सरकार आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करेल. जी समिती स्थापन होईल ती समिती आपला अहवाल देईल. मुख्य सचिव, परिवहन सचिव आणि वित्त विभागाचे सचिव यांची ही समिती असेल. न्यायालयाच्या आदेशाची ताबडतोब पूर्तता करणार आहोत. संप चिघळत आहे त्यापेक्षा संपावर लवकर तोडगा काढण्याचं काम सुरु आहे.
राज्यातील 17 वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन स्थापन केलेल्या एसटी महामंडळ कामगार संघटना कृती समितीची दीड वाजता इंटक कार्यालय सीएसटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे ST कर्मचाऱ्याची आत्महत्या... ब्रम्हपुरी ST आगारातील वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या, सत्यजित ठाकूर (34) असे आहे युवा ST कर्मचाऱ्याचे नाव. ब्रह्मपुरी शहरातील झाशी राणी चौक येथील किरायाच्या रूमवर विषप्राशन करून केली आत्महत्या, गेले 3 दिवस कुणालाही भेटले नव्हते ठाकूर, आज अचानक शेजाऱ्यांनी दार ठोठावल्यावर प्रतिसाद मिळाला नसल्याने तोडले दार, मात्र आत्महत्येचे कारण अजून अज्ञात
काल परत एका बीडमधील एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला पण त्यांचा डॅाक्टरांमुळं प्राण वाचला पण परिस्थिती नाजूक आहे.
आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीये पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर ३१ जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती.
जराही नैतिकता शिल्लक असेल तर ३१ जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का?
आम्ही लोकशाही मार्गाने आंदेलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहोत.
आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून साठी मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही.
आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. पण त्या 31 कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा.
एस.टी. संपाबाबत राज्य सरकार दुपारपर्यंत अध्यादेश काढणार, तीन सदस्यीय समिती स्थापन करणार, राज्य सरकारची माहिती,
संध्याकाळी हायकोर्टात पुन्हा सुनावणी
ठोस निकाल येईपर्यंत कामगार संपावर ठाम
एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल
आर्यन खानच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री ठाकरे नवाब मलिक आणि गृहमंत्र्यांसोबत बैठका घेतात
मग एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा का होत नाही?- पडळकर
रायगड जिल्ह्यातील एस टी कर्मचारी आजपासून पुन्हा बेमुदत संपावर
प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांनी दिले विभाग नियंत्रकांना पत्र..
रायगड जिल्ह्यातील आठ आगारातील कर्मचारी संपावर गेल्याने एसटी वाहतुक ठप्प..
तर दापोलीत एक कर्मचारी हातात बांगड्या भरून कामावर हजर.. एकीकडे कर्मचारी आत्महत्या करत असतानाही तुम्ही कामावर जात आहेत, कामावर गेलात तर हातात बांगड्या भरून जा,असं पत्नीनं म्हटल्यानं बसचालक अशोक वनवे बांगड्या घालून कामावर हजर
गुहागरमध्ये एस टी कर्मचाऱ्याचा काम बंद ठेवून संपाला पाठिंबा.. 'एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे'या मागणीसाठी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी काम बंद ठेवण्यात आले आहे..
जिल्ह्यातील एस.टी.वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दुपारपर्यंत अजूनही तालुक्यातील कर्मचारी संपात उतरण्याची शक्यता आहे.
अजून चिपळूण आगाराची वाहतूक सुरु आहे.
गुहागर आगारातील वाहतूक बंद आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी उपोषण करुन बसेस बंद ठेवल्या होत्या.दोन दिवसांनंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक डेपो सुरु झाले . काल पासून मालेगाव,मनमाड,येवला यासह जिल्ह्यातील अनेक एसटी कर्मचा-यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.
कल्याण -
कल्याण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण डेपोतील एकही एस टी बाहेर निघाली नाही बसस्थानक पूर्णपणे बंद
बंद कल्याण डेपोतील सर्व कामगार सहभागी
एस टी डेपोत पोलिस बंदोबस्त तैनात
राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिल्यानंतर आता राज्यभरातील ठिकठिकाणचे डेपो बंद होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या 250 पैकी 220 डेपो बंद असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. सध्या केवळ मुक्कामी असणाऱ्या गाड्या पुन्हा एकदा आपल्या डेपोकडे पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे गाड्या मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहिला मिळत आहेत. आज सकाळपासूनचं मुंबई सह उपनगरात एसटी बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढताना पाहिला मिळत आहे.
सोलापूरात देखील एसटीची चाकं थांबली, प्रवासासाठी अनेकजण बसच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र मध्यरात्री पासून कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. ऐन दिवाळीत या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील सातही आगारांनी टप्प्याटप्पाने या कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याने 7 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील एकाही आगारातून बस बाहेर पडली नाही. त्यामुळे काल दिवसभरात बुलडाणा विभागाचे 30 ते 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्त्यात वाढ करावी. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागण्या कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या आहेत. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. मात्र तरीही सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील चिखली व खामगाव येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी 5 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले. तर 6 नोव्हेंबर रोजी मेहकर आगारातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उडी घेतली. काल बुलडाणा, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव या आगारातील कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलनात उडी घेतल्याने काल दिवसभरात एकही बस आगाराच्या बाहेर निघाली नाही. एसटी कर्मचारी नित्याप्रमाणे कामावर हजर झाले. मात्र त्यांनी गाड्या बाहेर काढण्यास नकार दिल्याने एसटी बसस्थानकावरील प्रवाशांची तारांबळ उडाली.यात मात्र खासगी वाहतूकदारांची दिवाळी झाल्याचे दिसून आले आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून वाहतूक सुरू केली आहे. खासगी काळ्या पिवळ्या, ऑटो, थेट एसटी बसस्थानकात घुसून प्रवासी गोळा करत होते.नाईलाजास्तव प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला.
पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर एसटी डेपो मध्यरात्रीपासून कर्मचारी संपात सहभागी, रात्री बारापासून एक ही एसटी बस या डेपोंमधून बाहेर गेलेली नाही, सकाळपासून स्वारगेट एसटी स्टँड येथे प्रवाशांची मोठी गर्दी आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचारी होणार संपात सहभागी, आज मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर जाणार, सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे होणार हाल, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विभागाचे विभाग नियंत्रकांना पत्र
पार्श्वभूमी
ST Workers Strike LIVE Updates Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. काल उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.
जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेत. राज्यातील 250 पैकी 160 आगार सध्या बंद आहेत. आज आणखी बस डेपोतील कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे.
तिकडे मुंबईतही 17 एसटी कर्मचारी संघटनांची महत्वाची बैठक होतेय. याशिवाय एसटीचा प्रश्न आता न्यायालय दरबारी गेलाय. त्यामुळे उच्च न्यायालयातही याबाबत सुनावणी होणार आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे. शनिवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे. सध्या 250 बस आगार पैकी 160 बस डेपो बंद आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राज्यातील सरपंच परिषदेसह इतर संघटनांकडून पाठिंबा मिळण्यास सुरुवात झालीय.
संपाला पाठिंब्याबाबत 17 संघटनांची मुंबईत आज बैठक
एसटी कामगारांच्या संपाला पाठिंबा देण्याविषयी आज, सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईत कृती समितीची बैठक होणार आहे. समितीत नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन सर्व आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे. राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी एसटीतील 17 कामगार संघटनाच्या कृती समितीने 27 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयात सुनावणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. कारण कामगार संघटना संपावर ठाम आहेत. याप्रकरणी आज हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात तूर्त कोणताही आदेश देत नसल्याचे स्पष्ट करत राज्याच्या महाधिवक्त्यांना सोमवारी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. त्यामुळं या सुनावणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार
एसटीच्या संपावर तोडगा काढण्यास राज्य सरकार तयार झालंय. संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती 3 महिन्यांत न्यायालयाला अहवाल देणार असल्याचं कळतंय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -