धुळे :  एसटी तर्फे चालक तथा वाहक पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेला बसलेल्या 35 हजार 463 उमेदवारांपैकी 30 हजार 68 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तब्बल 742 महिलांचा समावेश आहे. सदर निकाल महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्र  व शारिरीक उंची  व अन्य अहर्तासंबंधीची तपासणी झाल्यानंतर 100 गुणांची संगणकीकृत वाहन चालन चाचणी होणार आहे. या चाचणीचे गुण व लेखी परीक्षेचे गुण एकत्रित करुन अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच ज्या महिला उमेदवार उत्तीर्ण झाल्या आहेत, त्यांची केवळ शारीरिक उंची व अन्य   अहर्तासंबंधीच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन त्यांना एसटीतर्फे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे यावेळी एसटी चालक पदासाठी तब्बल 900 महिलांनी अर्ज केला होता.   आतापर्यंत एसटी महामंडळात एकही महिला चालक नाहीये. या भरतीनंतर महाराष्ट्रभरात महिला कंडक्टरसोबत महिला ड्रायव्हरदेखील प्रवाशांच्या सेवेला येणार आहेत.

या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या महिला चालक एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. महामंडळाने महिलांसाठीच्या अटी शर्तींमध्ये देखील शिथिलता आणली आहे.

दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या 8022 चालक तथा वाहक पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये महिला उमेदवारांचे 932 अर्ज प्राप्त झाले होते. महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या 685 पदांसाठी 2406 अर्ज दाखल झाले होते.