पुणे: प्रश्न राज्याचा होता, त्यामुळे हल्ला करायचा होता तर 'मातोश्री'वर करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी केलं आहे. दिलीप मोहिते पाटील हे पुण्यातील खेड-आळंदीचे आमदार आहेत. 


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घराऐवजी मातोश्रीवर हल्ला करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती असं आमदार मोहिते म्हणाले. खेड-आळंदी या त्यांच्या मतदारसंघात शुक्रवारच्या हल्ल्याचा निषेध करताना ते बोलत होते. 


आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, परिवहन मंत्रीपद हे शिवसेनेच्या अनिल परब यांच्याकडे आहे. त्यामुळे या विषयाशी पवार साहेबांचा दुरान्वये संबंध नाही. तरीही काही शक्तींनी कालच कृत्य केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचा सर्वात मोठा वाटा आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला अस्थिर करण्यामागे या शक्ती लागलेल्या आहेत असंही मोहितेंनी पुढे नमूद केलं.


एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने काल, शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचं समोर आलं. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :