ST Employee : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी एसटी महामंडळाने (MSRTC) 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनीही राज्य सरकारचे आभार मानले. 


दरम्यान, या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा सेवेत घेतलं जाणार असून पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर रुजू करुन घेतलं जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. या जल्लोषात अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी तसेच कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष अॅड. जयश्री पाटील या देखील सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी सदावर्ते यांनी मागील सरकारवर तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका केली. तर गुरुवारपासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सरकारचे आभार मानले. तसेच सदावर्ते यांचे देखील आभार मानले. 


बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिले होते. एसटी महामंडळासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. या कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचा संप
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात संप पुकारला. एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी तब्बल 6 महिने एसटी संप सुरु होता. 23 डिसेंबरपर्यंत कर्तव्यावर येण्याचं आवाहन महामंडळाने केलं होतं. परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली. परिणामी राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी 24 डिसेंबरपासून महामंडळाने कर्मचाऱ्यांवरील कारवाईला सुरुवात केली. मात्र याला न जुमानता कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने राज्यात सर्वत्र संप सुरु ठेवला होता.  हळूहळू बहुतांश कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घेण्यात आल्या. मात्र 118 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची टांगती तलवार होती. अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आलं होतं.


शरद पवारांच्या घरावर हल्ला आणि 118 कर्मचारी बडतर्फ
महाविकास आघाडीच्या काळात ST आंदोलन खूप गाजलं होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 118 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आलं होतं. 


VIDEO : Gunratna Sadavarte On ST Worker : 118 बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत, सदावर्तेंनी केला जल्लोष



सरकारकडून एसटी महामंडळाला 300 कोटींची मदत
दरम्यान राज्य सरकारने एसटी महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत केली आहे. कर्मचाऱ्यांचं सप्टेंबर महिन्याचं वेतन देण्यासाठी सरकारने ही मदत केली आहे. याबाबतचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान एसटी महामंडळाला महिन्याला 360 कोटी लागतात. सरकार देत असलेला निधी अपुरा आहे. निधी कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता दिवाळी येत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांची कुचंबणा थांबवण्यासाठी जितकी मागणी महामंडळाने केली आहे तितका निधी सरकारने द्यावा, असं काँग्रेसच्या  महाराष्ट्र एसटी कर्मचारी, सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.