अकोल्यात एसटी बंद, तर इतर ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात वाहतूक
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2018 11:10 PM (IST)
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्तात एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पुणे जिल्ह्यातील सणसवाडी येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (3 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून कडेकोट बंदोबस्तात एसटी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभाग नियंत्रकांनी बसस्थानक, आगार इमारत, नियंत्रण कक्ष, विभागीय कार्यालये, विभागीय कार्यशाळा या सर्व ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त मागवून घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने बस वाहतूक सुरु ठेवावी, असंही म्हटलं आहे. आंदोलनामुळे वेळोवेळी बदल होणारी माहिती बसस्थानकावर फलकावर प्रदर्शित करावी, असा आदेशही देण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय होणार नाही. अकोला जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी अकोला जिल्ह्यात एसटी सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आज म्हणजे 2 जानेवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते उद्या (3 जानेवारी) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यातील बससेवा बंद राहिल. गैरसोय टाळण्यासाठी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या :