मुंबई : राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना गूडन्यूज दिली आहे. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये 14 हजार पदासाठी भरती निघाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावत यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
एसटीमध्ये चालक, वाहक, सहाय्यक (मॅकेनिकल) आणि पर्यवेक्षक दर्जाची एकूण 14247 पदं रिक्त आहेत. ही पदं लवकरात लवकर भरण्याचे आदेश दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
कोकणात सर्वाधिक पदं भरणार
विशेषत: कोकणात चालक आणि वाहकांची कमतरता अधिक आहे. त्यामुळे ही पदं तातडीने भरण्याच्या सूचना दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या सहा विभागांमध्ये 7923 चालक आणि वाहकांची भरती करण्यात येणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2548 लिपीक, 3293 सहाय्यक आणि 483 पर्यवेक्षकांची भरती लवकरच करण्यात येईल.
भरतीची जाहिरात कुठे?
या भरतीची सविस्तर जाहिरात 7 जानेवारीपासून एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in आणि www.msrtcexam.in या वेबसाईटवर उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची प्रक्रिया 12 जानेवारीपासून सुरु होईल, तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी असेल.
चूक दुरुस्तीसाठी मुदतवाढ!
महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरताना अनावधानाने चुकीची किंवा राहून गेलीली माहिती दुरुस्त करण्यासाठी किंवा भरण्यासाठी महामंडळाने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.