Maharashtra ST News:  एसटी महामंडळाने (MSRTC) आपल्या अधिकृत बस थांब्यावर (ST Bus Stop) प्रवाशांच्या सोयीसाठी काही वर्षांपूर्वी अवघ्या 30 रुपयामध्ये चहा-नाश्ता देण्याची योजना जाहीर केली होती. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने महामंडळाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत बस थांब्यावर 30 रुपयात चहा-नाश्ता न दिल्यास हॉटले चालक आणि अधिकृत बस थांब्यावर बस न थांबवल्यास चालक-वाहकावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाने काढले आहेत. त्याशिवाय महामंडळाचे उत्पादन असलेले 'नाथजल' (Nathjal) देखील छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. 


सध्या उन्हाळी हंगाम आणि सुट्ट्यांचे दिवस असल्याने एसटीच्या गाड्यांना गर्दी आहे. तर, दुसऱ्या बाजूला एसटी प्रवाशांना एसटी महामंडळाच्या या योजनांचा फायदा होताना दिसत नाही. ठरलेल्या दरात नाश्ता आणि नाथजल उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने  वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी निश्चित केली आहे. 


एसटी महामंडळाने खासगी थांब्यावर खासगी हॉटेल चालकांना रुपयांमध्ये चहा आणि नाश्ता देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, संबंधित खासगी हॉटेल चालक याची अंमलबजावणी करतात की नाही याची खातरजमा करण्याची सूचना मार्गतपासणी पथक, वाणिज्य आस्थापन आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याची सूचना करण्यात आली आहे. 


त्याशिवाय, एसटी महामंडळाचे 'नाथजल' छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 


एसटी महामंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होत नसल्यास, एसटीचा अधिकृत थांबा ज्या विभागाच्या अखत्यारीत येतो त्या विभाग नियंत्रकास लेखी अहवाल सादर करावा, तसेच कारवाई करण्यात हयगय आढळल्यास बस स्थानकावरील वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापक यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही करावी असे आदेश देणारे परिपत्रक एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक ( नियोजन आणि पणन ) यांनी काढले आहेत. 


30 रुपयांच्या नाश्तामध्ये काय?


एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडा पाव, इडली  आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता 30 रुपयांना द्यावा लागणार आहे. तर, एसटी महामंडळाचे 'नाथजल' या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी 15 रुपये आकारण्यात येत आहे. यामध्ये विक्रेत्याने कुलिंग चार्ज अथवा इतर कारणाने छापील किंमतीपेक्षा अधिक दर आकारू नये असे आदेश महामंडळाने दिले आहेत.