मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपामध्ये सहभागी झालेल्या 1010 रोजंदारी कर्मचाऱ्यांना एसटीच्या स्थानिक प्रशासनाने सेवामुक्त केलं आहे. हे कर्मचारी 8 आणि 9 जून रोजी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाले होते.


नुकतेच महिना-दोन महिन्यांपीर्वी रुजू झालेल्या सुमारे नऊ हजार रोजंदार कर्मचाऱ्यांचा 2016-20 च्या कामगार वेतन करारशी कोणताही संबंध नाही, तरीही त्यांच्यापैकी 1010 रोजंदार कर्मचारी संपात सहभागी झाले आणि कामावर विनापरवानगी गैरहजर राहिले, असं एसटी प्रशासनाने म्हटलं आहे.

या कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे एसटी महामंडळाचं नुकसान तर झालंच, शिवाय प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाने कळवलं आहे.

दरम्यान, या नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांना आता संधी दिली जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं दोन दिवसात 33 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा 18 कोटी रुपयांचा महसूल बुडाला, तर पहिल्या दिवशी 15 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.