मुंबई : राज्यातील फक्त 31 एसटी आगारांसह सर्व बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी परिवहन मंत्रालयाने तब्बल 447 कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाकडे 1800 सफाई कामगार असताना, नाहक खर्च करत खासगी कंपनीला कंत्राट दिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील 31 एसटी आगारांसह राज्यातील सर्व बस स्थानकांची सफाई करण्यासाठी खासगी कंपनीला 447 कोटींचे कंत्राट दिले हे खरे आहे का, असे विधिमंडळात आमदारांनी विचारल्यावर, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी उत्तरात यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

परिवहनमंत्री रावते यांनी माहिती दिली की, “बीव्हीजी इंडिया प्रा. लि., ब्रिस्क इंडिया लि. यांसह एकूण सहा कंपन्यांनी निविदेमध्ये सहभाग घेतला होता. त्यातून बिस्क इंडिया प्रा. लि. कंपनीसोबत एसटी महामंडळाने करार केला आहे. या करारानुसार, बस, बसस्थानकं, कार्यालये, विश्रांतीगृह, पाण्याच्या टाक्या इत्यादी ठिकाणांची स्वच्छता या कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.”

1800 एसटी सफाई कामगारांबाबतचा प्रश्नही उपस्थित केला गेला. या सफाई कामगारांची इतर ठिकाणी नियुक्ती करणार की हे बेरोजगार होणार, असा प्रश्न विचारल्यानंतर रावते म्हणाले, “एसटी महामंडळात सध्या कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना पर्यायी काम देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. मात्र अनुकंपा तत्त्वावर किंवा पर्यायी नोकरी सफाईगार पदी नेमणुका देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.”

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधिमंडळात लेखी उत्तरात ही सर्व माहिती दिली.

दरम्यान, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना आणि स्वच्छतेसाठी 1800 सफाई कामगार सध्या एसटी महामंडळाकडे असताना, एखाद्या खासगी कंपनीला 447 कोटींचा कंत्राट का दिले जाते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.