मुंबई : एसटी महामंडळाकडून सुरु असलेल्या चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे भरती प्रक्रियेला सामोरं जावं, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना करण्यात आलं आहे.


गेल्या चार वर्षांमध्ये एसटी महामंडळामार्फत अतिशय पारदर्शक पद्धतीने विविध पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. स्वतः महामंडळाचे अध्यक्ष प्रत्येक भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही पदाच्या भरती प्रक्रियेत अध्यक्षासहित कोणाचाही वशिला चालणार नाही, तसंच इतर प्रलोभनं किंवा कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असं एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे.

उमेदवारांना भरती प्रक्रियेबद्दल काही शंका किंवा तक्रार असल्यास आपल्याकडील सबळ पुराव्याच्या आधारे 1800-1218414 या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंद करावी, असं आवाहन एस.टी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.

24 फेब्रुवारी 2019 रोजी राज्याच्या 21 जिल्ह्यांमध्ये सुमारे 8 हजार 22 चालक आणि वाहकपदांसाठी लेखी परीक्षा पार पडली. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रिया सुरु असून यापैकी  पात्र उमेदवारांना संगणकीय चालन परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे.

लेखी आणि संगणकीय चालन परीक्षा यांच्या संयुक्त गुणतालिकेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना काही जणांकडून नियमबाह्य पद्धतीने काम करुन अंतिम निवड यादीत नाव समाविष्ट करण्याचं आमिष संबंधित 'एजंट'कडून दाखवण्यात येत असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांना फोनवरुन किंवा प्रत्यक्ष भेटून काही उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने अशा तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. सध्या सुरु असलेल्या चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक पात्रतेची चाचणी पूर्ण करण्यात येत असून कोणत्याही वशिला किंवा अवैध हस्तक्षेपाने उमेदवाराला भरती केले जाणार नाही. तसेच 17 ते 19 मे रोजी विविध वर्ग 1 आणि 2 च्या अधिकारी पदासाठी होणाऱ्या लेखी परीक्षेबाबत देखील उमेदवारांनी वशिलेबाजी, आमिष किंवा प्रलोभनाला बळी पडू नये, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.