बीड : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजे जावयाची मिरास गाजवणारा महिना. हा महिना संपला आणि बीड जिल्ह्यातील एका जावयाने आपल्या सासऱ्याला कौटुंबीक वादातून अंगावर ट्रक घालून चिरडलं. यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला.


विठ्ठल चंद्रभान मराठे (55) असं सासऱ्याचं नाव आहे. आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथे काल रात्री ही घटना घडली.

मराठवाडी येथील विठ्ठल मराठे यांच्या घरावर त्यांचा जावई अशोक शिंदे (रा.दगडवाडी ता.पाथर्डी) याने दहा चाकी ट्रक (एम.एच.16 सी.सी.1276) भरधाव वेगाने धडकवला. वेगाने आलेल्या ट्रकने घरासमोर उभ्या असलेल्या मिनी वाहनाला उडवत घराच्या अंगणात झोपलेल्या सासरे विठ्ठल मराठे यांना चिरडलं. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

कौटुंबीक वादातून हे कृत्य जावयाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. जावई अशोक शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र नेमका वाद काय होता, याबाबत अद्याप समज शकलेलं नाही.