हिंगोली : डबल ड्युटी करुन घरी परतत असताना एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीत घडली. हिंगोली आगारातील भास्कर अवचार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामाच्या अति तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यामध्ये काही कर्मचारी सहभागी आहेत, तर काही जण सेवेत आहेत.
हिंगोली आगाराचं नियोजन गेल्या काही दिवसांपासून कोलमडलं असल्याचा आरोप आहे. चालक आणि वाहकांच्या ड्युटीच्या वेळाही वारंवार बदलल्या जात आहेत. त्यामुळे चालक आणि वाहक त्रस्त झाले आहेत. त्याचमुळे कर्मचाऱ्यांना अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय.
एसटी कामगार संघटना आक्रमक
दरम्यान, या घटनेनंतर एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी भास्कर अवचार यांना जबरदस्तीने ड्युटी लावल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ ओढावली, असा आरोप आगारातील अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे.
''आगारातील अधिकाऱ्यांनी भास्कर अवचार यांना परत ड्युटीवर जाण्याचे आदेश दिले. मात्र आपली प्रकृती बरी नसल्याचं त्यांनी सांगितलं. तरीही आगाराच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे कामाचा ताण येऊन अवचार यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांनी हा प्रकार इतर सहकार्यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं जात होतं, पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला,'' अशी माहिती देण्यात आली.
या प्रकारामुळे आगारात एकच खळबळ उडाली असून वाहक आणि चालक संतप्त झाले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. शिवाय आगाराची बस सेवाही बंद झाली आहे.
आगार प्रमुखांनी आरोप फेटाळले
दुसरीकडे आगारप्रमुख बाळासाहेब झरीकर यांनी मात्र या आरोपाचं खंडन केलं आहे. ड्युटी बुकिंग अधिकारी वाबळे यांनी देखील अवचार यांना पुढे तीन दिवसाची सुट्टी पाहिजे होती म्हणून त्यांनी ही डबल ड्युटी मागून घेतल्याचं सांगितलं.
या घटनेत खरं काय आणि खोटं काय ते समोर येईलच, मात्र कामाचा ताण एसटी कर्मचाऱ्यांवर आहे, हे स्पष्टपणे या घटनेतून समोर येत आहे. त्यातच काही कर्मचारी संपावर असल्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर आहे.
डबल ड्युटी करुन घरी परतताना एसटी चालकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jun 2018 05:23 PM (IST)
हिंगोली आगारातील भास्कर अवचार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामाच्या अति तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं बोललं जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -