धुळे : दहा ते पंधरा वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन हजार 307 चालक-वाहकांना एसटी महामंडळाने नवीन वर्षाची भेट दिली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देऊन एसटीने सुखद धक्का दिला आहे. बदलीसाठी अर्ज केलेले बहुतांश कर्मचारी हे कोकणात नोकरीनिमित्त कार्यरत होते. महाराष्ट्रातील विविध विभागातून आलेले उमेदवार कोकणामध्ये कायमस्वरुपी नोकरी करण्यास फारसे उत्सुक नसतात. कोकण प्रदेशाची जाहिरात आली, की अनेक जण अर्ज करतात, मात्र निवड होऊन रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बदलीचा अर्जही देतात. एसटीमध्ये गेली दहा-पंधरा वर्षे बदलीचा अर्ज देऊन प्रतिक्षा करणाऱ्या चालक-वाहकांना परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या निर्देशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व 3307 कर्मचाऱ्यांना 7 जानेवारी 2019 पर्यंत संबंधित विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त करावे, असेही आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे नवीन वर्षात हे सर्व कर्मचारी आपल्या विनंतीनुसार इच्छित गावी परत जातील.