बीड : निवडणूक आयोगाच्या कामाला आम्हाला जुंपलं जातं, अशी ओरड शिक्षकांकडून होत असते. अनेकदा तर हे काम टाळतानाही शिक्षक आढळून येतात. अशी स्थिती एकीकडे असताना बीडमधील एका शिक्षकाने वेगळा पायंडा पाडला आहे. नुसता पायंडाच नव्हे, तर एक आदर्श निर्माण केला आहे.


'न्यूटन' सिनेमात अभिनेता राजकुमार राव हा नक्षलवादी भागात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी जीव धोक्यात टाकतो. तसेच काहीसे बीडमधील संदीप पुरी या शिक्षकाने जीव धोक्यात टाकून  निवडणूक प्रक्रियेत लोकसहभागासाठी प्रयत्न केले आहेत.



निवडणूक म्हणजे लोकशाही भक्कम करण्याचं माध्यम. याच निवडणुकीची सर्व कामं पाहणाऱ्या निवडणूक आयोगाला सर्वतोपरी मदत सरकारी शाळांमधील शिक्षक करत असतात. मतदार याद्यांपासून ते मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणापर्यंत, बहुतेक कामांमध्ये शिक्षक मदत करतात. मात्र अनेक ठिकाणी काही शिक्षक या कामांना नकार देतात, हे आमचं काम नसल्याचेही सांगतात. बीडमधील एक शिक्षक मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत, एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून समोर उभा ठाकला आहे. संदीप पुरी असे या शिक्षकाचे नाव आहे.



बीड तालुक्यातील आहेर चिंचोली येथील संदीप पुरी या शिक्षकाने जीव धोक्यात घालून निवडणूक आयोगाचे काम केले आहे. नदीपलिकडे राहणाऱ्या 42 मतदारांची नोंदणी करण्यासाठी चप्पूवरुन नदी पार केली आणि मतदारांची नोंदणी केली.

राज्य निवडणूक आयोगानेही संदीप पुरी या शिक्षकाच्या या धाडसी कामाची दखल घेत सत्कार करुन कौतुक केले आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर शिक्षकाचे फोटोही प्रसिद्ध केले.



दरम्यान, एकीकडे निवडणूक कामास नकार देणाऱ्या 6 शिक्षकांवर शिरुर पोलिस ठाण्यात थेट तहसीलदारांनी गुन्हे नोंद केले असताना, दुसरीकडे संदीप पुरी यांच्यासारख्या शिक्षकाचं उदाहरण आहे. निवडणूक म्हणजे लोकशाही मजबूत करण्याचं माध्यम आणि हीच लोकशाही अधिक मजबूत करण्याचं काम संदीप पुरी यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.