नागपूर : अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पॅनलची सत्ता असणाऱ्या स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेतून (ST Bank) सभासदांनी तब्बल 180 कोटी रुपये काढण्यात आल्याची कबुली आज (11 डिसेंबर) राज्य सरकारकडून देण्यात आली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (Maharashtra Assembly Winter Session 2023) शिवसेना ठाकर गटाकडून आमदार अनिल परब आणि सचिन अहिर यांनी आवाज उठवल्यानंतर सहकार खात्याकडून उत्तर देण्यात आले. 


बँक संचालक मंडळ बरखास्त करणार का? प्रशासक नेमणार का?


सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, 9 टक्के आणि 14 टक्के व्याजदर होता तो संचालक मंडळाने कमी करण्याचा म्हणजे 7 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल 180 कोटी रुपये सभासदांनी काढून घेतलं हे खरं आहे. या प्रकरणात सहकार आयुक्त आणि रिझर्व्ह बँक यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारकडे नसून तो रिझर्व्ह बँकेकडे आहेत. रिझर्व्ह बँकेने सांगितल्यानुसार आता व्याजदर 9 टक्के आणि 14 टक्के केले आहेत आहेत. बँकेची परिस्थिती अधिक वाईट होऊ नये यासाठी आम्ही लक्ष ठेऊन आहोत, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले. 


बँक संचालक मंडळ बरखास्त करणार का? प्रशासक नेमणार का? असा सवाल अनिल परब यांनी केल्यानंतर मंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की, ठेवी काढल्या हे सत्य आहे. बँकेवर प्रशासक लावावा असा कोणताही अर्ज किंवा मागणी आमच्याकडे नाही. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये नुकतेच काही बदल झाले आहेत. बँक संचालक मंडळ बरखास्त करायचे असेल तर तो अधिकार आता रिझर्व बँकेनं आपल्याकडे ठेवला आहे. 


दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाने बँकेचा सभासद हा पगारदार असल्याने जामीनदाराची गरज नाही. कर्जाचे व्याजदर 9 टक्के व 14 टक्के वरुन 7 टक्के कमी करण्याचा ठराव रिझर्व्ह बँकेने मागे घेतल्याचं देखील सरकारकडून लेखी उत्तरात सांगण्यात आले. 


100 टक्के रिकव्हरी बँकेचा केवळ 23 वर्षाचा एमडी 


शेकाप आमदार जयंत पाटील यांनीही बँकेच्या कारभारावप प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, 100 टक्के रिकव्हरी बँकेचा केवळ 23 वर्षाचा एमडी केला होता. आता त्याला काय कळणार? हे लक्षात येत नाही. सदावर्ते यांनी केवळ मेहुणा आहे म्हणून 23 वर्षाचा मुलाला यांनी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर केलं आहे. सदावर्ते आणि त्यांची पत्नी टेक्निकल बोर्डावर आहेत. हे कुठले नियमाने त्यांनी केलं. यावर करवाई करा. ज्यांनी निकष पूर्ण केलले नाहीत त्यांना पदावर बसूच कसं दिलं? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली. 


सदावर्तेंच्या अनियमितता दुरुस्त केल्या जातील


यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, नुकतंच नवीन संचालक मंडळ त्या ठिकाणी आल आहे. त्यांनी हा पहिल्याच बैठकीत निर्णय घेतला. आम्ही जे चुकीचं घडत आहे तिथं आम्ही लक्ष ठेऊन आहोत. 89 अ खाली सध्या चौकशी सूरू आहे. तो अहवाल आला की तत्काळ निर्णय घेतला जाईल. या सभागृहाच्या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांना विश्वास देतो की तुम्ही काळजी करू नका बँक चांगली आहे. आम्ही लक्ष ठेऊन अहोत. सदावर्ते यांनी ज्या अनियमितता केली आहे त्या दुरुस्त केल्या जातील. 


इतर महत्वाच्या बातम्या