लातूर : इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील पहिला महत्वाचा टप्पा. तो टप्पा यशस्वीरित्या पार केलेल्या गुणवंतांनी लातूर बोर्डाचा निकाल उंचावला आहे. यंदाचा दहावीचा निकाल 92.16 टक्के इतका लागला. यावर्षी निकालाचा टक्का  चांगलाच घसरला आहे. मात्र तरीही निकालात 'लातूर पॅटर्न'ने बाजी मारली आहे ती गुणवत्तेच्या बळावर. राज्यात 151 विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यातले तब्बल 108 विद्यार्थी आहेत ते एकट्या लातूर विभागातले. म्हणून या निकालाला वेगळे महत्व आहे. या निकालात लातूर शहरातील केशवराज विद्यालयातील अकरा विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण घेतले आहेत. 


लातूर शहरातील केशवराज विद्यालयातील या विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय हे त्या मुख्याध्यापक कुलकर्णी यांना जातं. ते या विद्यालयातील 32 शिक्षकांचे टीम लिडर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सातत्याने या शाळेमध्ये शंभर नंबरी मार्ग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.


Latur Pattern: काय आहे शिक्षणाचा लातूर पॅटर्न? 


'यश आपल्या हातात असते. ते मिळवण्यासाठी आपण फक्त निष्ठेने प्रयत्न करायचे असतात. त्यात आपले शिक्षक, आई-वडील घरातील जेष्ठ मंडळी याचेही मार्गदर्शन मोलाचे असतात', हे उदगार आहेत दहावीत शंभर टक्के गुण घेणाऱ्या मानसी पाटील हिचे. ही केशवराज विद्यालयाची विद्यार्थिनी. या विद्यालयाचे शैक्षणिक वातावरण, शिक्षकाची समर्पित वृत्ती आणि विद्यार्थ्याना पूर्ण अभ्यासक्रम कसा लक्षात राहावा यासाठी चालली धडपड, अभ्यासासाठी अनुकूल असलेले वातावरण याचा परिणाम निकालावर होतच असतो.  यामुळेच या शाळेतील 11 विद्यार्थी शंभर टक्के गुण  घेण्यात यशस्वी झाले आहेत. 
    
वेळेचे नियोजन... स्वतःवर ठाम विश्वास... अतूट निश्चय आणि नियमित अभ्यास या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अभ्यासाच्या प्रवासाला निघालेले केशवराज विद्यालयातील 11 विद्यार्थी हे शंभर टक्के गुण घेण्यात यशस्वी झाले आहेत. वर्षभर या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी एकच ध्येय बाळगले होते. ते होते उत्तम यश प्राप्त करावयाचे. त्यांच्या मेहनतीचे व जिद्दीचे फळ त्यांच्या पदरात पडले.


'दहावीत काही विषयाची मनात भीती होती. त्यासाठी वेगळा वेळ दिला.  शांतपणे त्या विषयाचा अभ्यास केला. दिवाळीपासूनच शाळेमध्ये सराव परीक्षेला सुरवात झाली होती. त्यामुळे तयारीही झाली आणि बोर्डाच्या  परीक्षेबाबतची भीतीही कमी झाली.  प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबाबत सातत्याने सांगितले जात होते. त्यामुळे परीक्षेत ऐनवेळी कसली गडबड उडाली नाही. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अभ्यासातील नियमितपणा यामुळे शंभर टक्के गन मिळविणे शक्य झाले,' असं कैवल्य मोटेगावकर सांगतोय.


'किती वेळ अभ्यास केला यापेक्षा कोणत्या पद्धतीने अभ्यास झाला यालाच अधिक महत्व दिले. रात्री उशिरापर्यंतच अभ्यास करावा असे काही नाही. नियमित तीन तास अभ्यास करूनही यश मिळविता येते. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाची वेळ निभावल्याने हे शक्य झाले. आता केवळ एक टप्पा पूर्ण झाला आहे. भविष्यातही मोठी आव्हाने समोर असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावयाचे आहे, असं सिद्दी वाघमारे सांगते. डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न आहे.


केशवराज विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास 'दहावी प्रमुख' हे पद तयार  करण्यात आले आहे. ह्या पदावरील शिक्षक फक्त दहावीचा  अभ्यासक्रम त्याचे बदलते स्वरूप.  प्रश्नपत्रिकेची मांडणी त्यावरील उत्तरे या बाबत कायमच अपडेट राहत असतात. ते विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या काय समस्या असतील. त्यावरील अचूक मार्ग काय असतील यावरच काम करत असतात.  यातून विद्यार्थी-पालक-शिक्षक यात एक समन्वय तयार झाला यामुळे अभ्यासाचा आणि दहावीच्या परीक्षेचा ताण कमी झाला. हे यश प्राप्त झाले आहे, असे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी व्यक्त केले आहे तसेच यंदा विद्यार्थ्यांनी मिळालेले यश हे अभिमानास्पद आहे. यावेळी अंतर्गत गुण नव्हते.   विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश 'लातूर पॅटर्न'ची शोभा वाढविणारे आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दिवसेंदिवस निकालात कशी वाढ करता येईल? यावर आमचे लक्ष राहणार आहे, असे मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.


कोणत्या विभागात किती विद्यार्थी?


राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 आहे. त्यात लातूरमध्ये 108, पुणे 5, औरंगाबाद 22, मुंबई 6,अमरावती 7, कोकणातील 3 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यात शंभर टक्के निकाल लावताना ग्रेस गुणांचाही विचार करण्यात येतो.


100 टक्के विभागनिहाय शाळा 29.74 टक्के



  • पुणे- 1240 शाळा

  • नागपूर- 709 शाळा

  • औंरगाबाद- 644 शाळा

  • मुंबई- 979 शाळा

  • कोल्हापूर- 1089 शाळा

  • अमरावती- 652 शाळा

  • लातूर- 383 शाळा

  • कोकण -427 शाळा


ही बातमी वाचा :