Shivsena First List : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर झाल्यापासून शिंदे गटातील खासदारांचे उमेदवारीचं काय होणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 13 खासदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, या 13 जणांच्या उमेदवारीवरच टांगती तलवार होती. भाजपकडून सातत्याने सर्व्हेचा दाखला देत तसेच मतदारसंघातील आडाखे पाहून त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात येत होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिलेल्या खासदारांसाठी बळ लावताना पहिल्या यादीमध्ये आठ खासदारांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदे गटातील 13 पैकी आठ खासदारांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी अजूनही पाच मतदारसंघांमधील मात्र पेच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कल्याणमधील जागेचा सुद्धा समावेश आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत. 


5 जागांवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!


शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक, ठाणे, वाशिम-यवतमाळ, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या जागांवर तिढा असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे. भाजपकडून ठाणे आणि नाशिक या जागेवरती दावा केला आहे, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा या दोन्ही जागांवर दावा केला आहे. त्यामुळे हा कळीचा मुद्दा झाला आहे. 


नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. याठिकाणी हेमंत गोडसे शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यांनी गेल्या चार दिवसांपासून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. त्यांची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर करूनही पेचात सापडली आहे. ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ती जागा सोडण्यास तयार नाहीत. या ठिकाणी सध्या राजन विचारे ठाकरे गटाचे खासदार आहेत. 


दुसरीकडे, वाशिम यवतमाळ मतदारसंघांमध्ये सुद्धा भावना गवळी यांना डच्चू देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याठिकाणी दुसरा उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा महायुतीच्या वादामध्ये सापडला आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघांमध्ये सुद्धा हीच स्थिती आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी मात्र पहिल्या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये त्यांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. 


 इतर महत्वाच्या बातम्या