इंदापूर : इंदापूर तालुक्यात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. निमित्त होते सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाचे. या स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा समावेश होता. अनेक गावे वेगवेगळ्या पध्दतीने श्रमदान करीत होते. तालुक्यातील कळस व निरगुडे या दोन्ही गावांनी मात्र एक अनोखी शक्कल लढविली. श्रमदानात महत्वाचे हत्यार असलेले टिकाव व फावडे (खोरे) यांचं लग्न लावून अनोख्या पद्धतीनं त्यांनी श्रमदान केलं.


कळसगावचा नवरदेव तर निरगुडेगावची नवरीमुलगी यांचा विवाह करण्याचे ठरविले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी या लग्नाची तारीख ठरविली गेली. कळसगावचा टिकावराव तर निरगुडेगावची फावडेताई.

लग्न जरी या निर्जीव वस्तूंचे असले तरी खऱ्याखुऱ्या लग्नासारखे लग्न लावण्यात आले. पत्रिका काढण्यात आल्या. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी नवरा व नवरी मुलीला हळद लावण्यात आली. हळदी समारंभ मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आला. लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या गावी म्हणजेच कळसला लग्नाची तयारी करण्यात आली.

मंडप टाकण्यात आला. निरगुडेकर नवरीमुलीला घेऊन वऱ्हाडी मंडळी कळसगावाला आली. नवरा नवरीला नटविण्यात आलं. त्याना मंडपात आणलं गेलं, अक्षता वाटण्यात आल्या. गुरुजींनी माईक घेतला अन् मंगलअष्ठका म्हणण्यास सुरुवात केली. दोन मंगलअष्ठका झाल्यानंतर आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी शेजारी आसलेल्या ओढ्यात श्रमदान करण्यास सुरुवात केली. दोन्ही गावच्या लोकांनी काही वेळ एकत्र येऊन श्रमदान केले. अर्ध्या तासानंतर पुन्हा सगळी वऱ्हाडी मंडपात आली अन् अखेरच्या मंगलअष्ठका सुरु झाल्या आणि टिकावराव व फावडेताई यांचा शुभविवाह संपन्न झाला!

आहेर म्हणून आणलेली झाडे व बिया स्वीकारण्यात आली. तर आलेल्या वऱ्हाडी मंडळीना जेवण देण्यात आले. अशा प्रकारे हा शुभविवाह पार पडला.