नागपूर : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त उद्या बीकेसीत होणाऱ्या महामेळाव्यासाठी नागपूरहून एका विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली होती.  मात्र ही रेल्वे वेळेच्या जरा जास्तच आधी निघाल्यानं भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.


या विशेष ट्रेनची वेळ सकाळी साडे दहा वाजता सांगण्यात आली होती. मात्र सकाळी 9 वाजता जेव्हा कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर दाखल झाले, तेव्हा ती ट्रेन सकाळी 7 वाजताच रवाना झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यावेळी ट्रेनमध्ये फक्त 32 कार्यकर्ते होते.

ट्रेनच्या बदललेल्या वेळेची माहिती रेल्वे प्रशासनानं भाजपच्या नेत्यांना मेल केल्याचं सांगितलं. मात्र, तसे कोणतेही मेल आपल्याला मिळाले नसल्याचं सांगत भाजप नेत्यांनी हात वर केले.

अखेर वर्ध्यातून एक विशेष ट्रेन नागपूरला आणून नंतर ती मुंबईला रवाना करण्याची मागणी करण्यात आली. आता वर्ध्यातून नागपूरला ट्रेन पोहोचेपर्यंत दुपारचे साडे तीन वाजले.  आणि अखेर साडे तीन वाजता हजारो कार्यकर्त्यांसह ही ट्रेन मुंबईला रवाना झाली.

दरम्यान, भाजपच्या उद्या होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. या रॅलीसाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. राज्यासह देशभरातून सुमारे 4 लाख कार्यकर्त्यांची फौज मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. याशिवाय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यासाठी जातीने लक्ष घातलं आहे.

या जल्लोष सभेनंतर अमित शाह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स ऑडिट करणार आहेत. कार्यकर्त्यांना ऊर्जा दिल्यानंतर नेत्यांची झाडाझडती होणार आहे.

दुसरीकडे या रॅलीसाठी भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या मुंबईत दाखल झाले. पण मुंबईतील ट्रॅफिकचा फटका अमित शाहांनाही बसला. अमित शाह मुंबई विमानतळावरुन बीकेसी मैदानाकडे रवाना झाले. यावेळी काढण्यात आलेली बाईक रॅली मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकली.

संबंधित बातम्या

भाजपच्या शक्तिप्रदर्शनाला सलमानच्या जामीन निकालाचा फटका बसणार?

6 एप्रिलला भाजपचा महामेळावा, मुंबईत शक्तीप्रदर्शन