जालना : कौटुंबिक वादातून सासुरवाडीच्या लोकांवर नाराज असलेला एक जावई एवढा नाराज झाला की तो थेट महावितरणच्या हायव्होल्टेज टॉवरवर चढला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा गावात गुरुवारी गावातल्या लोकांना एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सायंकाळी अंदाजे चारच्या सुमारास एक तरुण महावितरणच्या 220 केव्हीच्या टॉवरवर चढल्याची गावात बोंब उठली. गावातली अबाल वृद्ध गावच्या शिवारातील टॉवरकडे धावत सुटली. तिथे गेल्यावर कोणीतरी 35 वर्षांचा अज्ञात तरुण टॉवरवर चढल्याचं निदर्शनास आलं. टॉवर खालची लोकं या तरुणाला खाली उतरण्याची विनंती करत होती. मात्र, याला हा तरुण कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान गावातील एका व्यक्तीला संबंधित तरुण आपल्या गावचा जावई असल्याचं लक्षात आलं आणि मग एकच गोंधळ उडाला.


मंगेश शेळके असे या तरुणाचे नाव असून तो याच तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी आहे. या तरुणाचा सोनखेडा गावातील मुलीशी 5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दरम्यान गुरुवारी तो माहेरला आलेल्या पत्नीला भेटण्यासाठी सासुरवाडीत आला, ज्यात त्याचा पत्नीबरोबर तसेच सासुरवाडीच्या इतर लोकांसोबत वाद झाला आणि याच वादातून त्याने हे पाऊल उचललं.


मात्र, बराच वेळ होऊनही हा तरुण खाली येत नसल्याने त्याच्या पत्नीसह सासुरवाडीच्या लोकांना या ठिकाणी बोलावण्यात आलं. मात्र, त्यालाही जावई जुमानत नसल्याने गावकऱ्यांनी शेवटी पोलिसांना बोलावलं, सर्वात अगोदर पोलिसांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क करून लाईट नसल्याने बंद असलेला विद्युत प्रवाह पुन्हा चालू न करण्याचा सूचना केल्या. दरम्यान पोलीस, गावकरी आणि कुटुंबियांनी या तरुणांला खाली येण्याच्या विनवण्या सुरूच ठेवल्या. अखेर चार तासाच्या परिश्रमानंतर हा जावई खाली उतरला आणि गावकरी तसेच कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.


या प्रकरणानंतर पोलिसांनी संबंधित तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई करत काल तहसीलदारांसमोर हजर केलं. ज्यात तहसीलदारांनी या जावायाला न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर तरुणाने दारूच्या नशेत हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान जावयाच्या या पराक्रमाने सुदैवाने या घटनेत कुठलाही अनर्थ न घडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.