जालना : शहरातील चंदनजीरा भागात दीड वर्षांपूर्वी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीला एक तरुण सातत्याने छेडायचा, शाळेत येता जाता पाठलाग करायचा या नित्याच्या त्रासाला कंटाळून या मुलीने ही बाब घरच्यांच्या कानावर घातली. मुलीच्या वडिलांनी या छेडछाड करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी समोरासमोर गाठलं. मात्र, सदर तरुणाने उलट मुलीच्या वडिलांना जबर मारहाण केली. या प्रकरणानंतर धास्तावलेल्या मुलीने 14 मार्च 2020 रोजी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या याच कृत्यामुळे मुलीच्या वडिलांनी आरोपी शेख अजहर शेख अब्दुल याच्या विरोधात चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी या आरोपी विरोधात चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपी पक्षाकडून बचावाचे 2 साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी, पीडित मुलगी तिची आई, पंच, साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या घटनेतील युक्तिवाद आणि पुराव्यानंतर काल (शुक्रवारी) जलदगती जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी लैंगिक अपराध संरक्षण अधिनियमानुसार आरोपीला 2 वर्ष सक्तमजुरी तसेच 4 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या शिक्षेनंतर मुलीच्या आईने फोनवरून प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी या शिक्षेवर समाधान व्यक्त करत 'अशा प्रकारे आपल्या कुटुंबातील कोणाला त्रास होत असल्यास प्रत्येकाने शेवटपर्यंत लढा देण्याची हिंमत केली पाहिजे. तसेच पुढील अनर्थ टाळण्यासाठी वेळीच तक्रार करण्याची गरज असल्याच बोलून दाखवले. या प्रकरणातील सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील म्हणून अॅडवोकेट वर्षा मुकिम यांनी बाजू मांडली. या निकालानंतर त्यांनीही प्रतिक्रिया दिली. "लहान मुलींच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. त्या थांबविण्यासाठी समाजामध्ये कायद्याचा धाक असणे खूप महत्त्वाचे आहे." त्यादृष्टीने न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान शहरात या निकालाची माहिती मिळाल्यावर अनेकांनी मुलीला योग्य न्याय मिळाल्याची भावना प्रगट केली.