India Politics: देशभरातील राजकीय पक्षांनी भाजपविरोधात मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधक भाजपविरोधात एकत्र येत आहेत. याच पार्श्वभूमीवर 17 आणि 18 जुलै रोजी विरोधी पक्षांच्या बैठकीची दुसरी फेरी बंगळुरु (Bengaluru) येथे होणार आहे. या बैठकीत भाजपविरोधात 24 पक्ष एकत्र येणार आहेत. बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) देखील उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपविरोधात होत असलेल्या पक्षांच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. तर पीडीपी पक्षाचे अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) हे देखील या बैठकीत उपस्थित असणार आहेत. त्यावरुन आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 


बिहारमध्ये झाली विरोधकांची पहिली बैठक


गेल्या वर्षी भाजपशी संबंध तोडून नितीश कुमार महाआघाडीत सामील झाले होते. तेव्हापासून विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. गेल्या काही महिन्यांत विविध राज्यांचा दौरा करून त्यांनी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यानंतर 23 जून रोजी त्यांनी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची मोठी बैठक बोलावली. या सर्वसाधारण बैठकीत 15 पक्षांचे 27 नेते सहभागी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाळ देखील या बैठकीत उपस्थित होते.


भाजपविरोधात 24 पक्ष येणार एकत्र


यावेळी भाजपविरोधातील विरोधकांचं कुळ मोठं होणार असल्याचं बोललं जात आहे. एमडीएमके, केडीएमके, व्हीसीके, आरएसपी, मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणी) हे 17-18 जुलै रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यावेळी होत असेलल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत एकूण 24 पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


मल्लिकार्जुन खर्गेंनी बोलावली दुसरी बैठक


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना बंगळुरूमध्ये होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सर्वांसाठी रात्रीचं जेवण (Dinner) ठेवण्यात आलं आहे आणि 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मुख्य बैठक सुरू होणार आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, मल्लिकार्जुन खर्गेंनी सोनिया गांधी यांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.


पहिल्या बैठकीपासून दुसऱ्या बैठकीपर्यंत किती राजकीय समीकरणं बदलली?


पाटणा येथे झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर तब्बल 25 दिवसांनी दुसरी सभा होणार आहे. पण मधल्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची (Maharashtra NCP Crisis) कहाणी पूर्णपणे बदलली. शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) बंडखोरी करून भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. एवढंच नाही तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावाही केला आहे. राष्ट्रवादीचा हा लढा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे येत्या काळात राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा:


New Delhi: दिल्ली पुन्हा हादरली! श्रद्धा वालकरसारखं आणखी एक हत्याकांड; उड्डाणपुलाखाली आढळले तरुणीचे तुकडे