बीड : पोरींना गर्भात मारणारा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या एका मुलीने अनेक संकटांना तोंड देत राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त जिल्ह्याचाच नव्हे तर देशाच झेंडा फडकावला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोनाली तोडकरने परिस्थितीला चितपट केलंय.

सोनालीचं गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. कारण राष्ट्रकुल स्पर्धेत महिला कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात सोनाली तोडकरने देशाचा झेंडा फडकवला आणि रौप्य पदक मिळवून दिलं.

सोनाली दुष्काळी आष्टी तालुक्यातल्या मंगरुळची राहणारी आहे. याच गावातून तिचा कुस्तीचा प्रवास सुरु झाला. आई-वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा देऊन खुराक पुरवला. त्यांच्या कष्टाचं पोरीनं चीज केलं आहे.

परिस्थितीला चितपट करत यशाचा झेंडा रोवण्यात यश

सोनाली गावातच कुस्तीचे डावपेच शिकली. पण गावात सुरु झालेला प्रवास सिंगापूरपर्यंत पोहोचला. ज्यात तिला अनेकांची साथ मिळाली. मंगरुळ गावाची कुस्तीची परंपरा जुनी आहे. इथल्या मातीत अनेक कुस्तीपटू घडले. मात्र सोनालीने अटकेपार झेंडा फडकविल्याचा प्रत्येक गावकऱ्याला अभिमान आहे.

आई वडिलांनी मोल मजुरी करुन सोनालीला प्रोत्साहन दिलं. आजही घरची परिस्थिती बदलली नाही. आजही तोडकर कुटुंब शेणा-मातीच्या घरात राहतं. सोनालीने परिस्थितीला चितपट केलंय. भविष्यात योग्य खुराक, सुविधा आणि प्रशिक्षण मिळालं तर सोनाली कुस्तीमध्ये नक्कीच देशाला सोनं मिळवून देईल.

पाहा व्हिडिओ :