सुनेशी पटत नसल्यानं मुलानं आईला स्मशानात ठेवलं
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2017 01:53 PM (IST)
बायकोशी पटत नाही म्हणून लक्ष्मीबाई आहुजा या मातेला त्यांच्या मुलानं चक्क स्मशानात ठेवलं आहे. अहमदनगरमधल्या घटनेवर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदनगर : मृत्यूनंतर माणसाला स्मशानात नेलं जातं, पण अहमदनगरमध्ये एका वृद्ध मातेवर जिवंतपणी स्मशानात राहण्याची वेळ आली आहे. बायकोशी पटत नाही म्हणून लक्ष्मीबाई आहुजा या मातेला त्यांच्या मुलानं चक्क स्मशानात ठेवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये लक्ष्मीबाई दिवस कंठीत आहेत. ज्या मुलाला आयुष्यभर हाताच्या फोडाप्रमाणं जपलं, त्याच मुलानं या मातेला जिवंतपणी स्मशान दाखवलं. मात्र, तरीही या मातेचं काळीज मुलासाठी तळमळतं आहे. ‘मुलगा वाईट नाही. पण सुनेशी पटत नाही, त्याचा नाईलाज होतो, म्हणून त्यानं इथं ठेवलं आहे.’ असं म्हणत ही माता आपल्या मुलाला आजही पाठिशी घालते. मुलगा रोज डबाही आणून देतो. आता फक्त घरी कधी नेतो, याचीच ही माऊली वाट पाहत आहे. दरम्यान, एबीपी माझानं ही बातमी दाखवल्यानंतर ‘माऊली’ नावाच्या सामाजिक संस्थेनं या स्मशानातल्या माऊलीच्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. मात्र, आजच्या धावत्या युगात आई-वडिलांचं स्थान कमी होत चाललं आहे का, माणुसकी संपत चालली आहे का? असा प्रश्न या घटनेमुळं उपस्थित झला आहे.