सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना सोलापुरात कालपर्यंत एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे नेहमी 'निवांत' राहणारे सोलापूरकर आता मात्र दहशतीत दिसत आहेत. 11 एप्रिलला झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याची माहिती काल (12 एप्रिल) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. ज्या परिसरात हा रुग्ण राहत होता त्याच्या आसपासचा परिसर पोलिसांनी तात्काळ सील केला.


ही बातमी रात्रीत वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वतः देखील आपले गल्ली-मोहल्ले मिळेल ते साहित्य वापरुन बंद केलेले पाहायला मिळाले. रात्रीत सोलापूरकरांनी हे परिसर स्वतःहून बंद केले आहेत. घाबरुन न जाता काळजी घेतल्यास कोरोनाशी मुकाबला करणे शक्य आहे. त्यामुळे जमेल तितकी काळजी घेणे गरजेचे आहे.


दरम्यान कोरनामुळे बळी गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या जवळपास 85 लोकांना आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांची तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे किराणा दुकान असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे परिसरातील जवळपास 7 हजार लोकांची तपासणी आरोग्य विभागातर्फे करण्यात येणार आहे. मृत व्यक्तीचे काल रात्रीच अंत्यसंस्कार ही करण्यात आले. केवळ दोन नातेवाईकांच्या उपस्थितीत सुरक्षेची काळजी हे अंत्यसंस्कार पार पडले.



सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी
56 वर्षीय एका रुग्णाला 10 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 11 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. या 56 वर्षीय रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असताना, काल (12 एप्रिल) दुपारी साडेतीनच्या सुमारास तो कोरोनाग्रस्त असल्याचा अहवाल समोर आला. यानंतर संबंधित मृत व्यक्तीच्या संपर्कात सगळ्यांचे नमुने घेऊन तपासणीचं काम सुरु करण्या आलं. तर रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे. रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली, त्याच्या संपर्कात कोण कोण आलं आहे याबाबत माहिती घेतली जात आहे.