नवा शर्ट नसल्याने हिरमुसलेल्या सोलापूरच्या चिमुरड्याची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 01:23 PM (IST)
सोलापूर : सोलापुरातील अवघ्या 13 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक बाब म्हणजे कार्यक्रमात घालायला नवा शर्ट नसल्याच्या कारणातून समर्थ लिगाडेने आपलं जीवन संपवलं. समर्थच्या आत्महत्येने अवघा सोलापूर जिल्हा हळहळला आहे. इतरांच्या अंगावर नवे कपडे पाहिले आणि 13 वर्षांच्या चिमुरड्यानेही नवे कपडे घालायचा हट्ट धरला. त्यानंतर रागाच्या भरात फास लावून घेतल्याचं त्याचे आजोबा सांगतात. समर्थचे वडील अकाली गेले. त्यानंतर त्याच्या आईनं जीवाचं रान केलं. खरं तर समर्थने लहान वयातच टाकीचे घाव सोसले होते, पण शर्टच्या हट्टापायी त्यानं आयुष्य संपवलं जगण्यातल्या संघर्षापेक्षा भौतिक सुख वरचढ ठरलं आणि निर्जिव वस्त्रांसाठी त्यानं बहुमोल जीव सोडल्याची खंत व्यक्त केली जात आहे.