सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सुरु केलेल्या 'लेट्स क्रॉस द बॉर्डर' या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या वतीने त्यांना पॅरिस येथे हा उपक्रम सादर करण्यासाठी आमंत्रण दिले होते. 1 एप्रिल ते 5 एप्रिलदरम्यान पॅरिस येथे आयोजित 'एज्युकेशन एक्सचेंज' या परिषदेत हा शैक्षणिक प्रकल्प सादर केला गेला. जगभरातील 300 शिक्षकांना याकरिता आमंत्रित करण्यात आले होते.


वर्गाध्यापनात तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण रीतीने वापर करणाऱ्या 78 देशांतील 300 उपक्रमशील शिक्षकांना याकरिता आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी भारतातील 13 शिक्षकांची निवड झाली होती. त्यामध्ये दिलीप राजू ( तामिळनाडू) विनिता गर्ग (दिल्ली), प्रीती कोकचा, कोवलीन मिधा, जया सूद, चांदनी अग्रवाल, हरिहरन मुर्थी (कर्नाटक ), भावी आहुजा, प्रीती सिंघल, चारू छाब्रा, अर्चना अवस्थी यांचा समावेश आहे.

भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या देशांतील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर बंधुभाव वाढीस लागावा व शांतताप्रिय नागरिकांची जडणघडण होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला 'लेट्स क्रॉस द बॉर्डर' हा उपक्रम मागील 2 वर्षांपासून सुरु असून आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यांची पीस आर्मी तयार झाली आहे. 6 आठवड्याच्या या उपक्रमात फिनलँड, ऑस्ट्रिया, बेल्जियमसह जगातील 10 देशांतील शिक्षक शांतताप्रिय नागरिकांची जडणघडण होण्याकरिता मार्गदर्शन करीत असून, आजतागायत 148 शाळांनी यात सहभाग नोंदवला आहे.