पंढरपूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसने सहा जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन केल्यानंतर मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे. आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा, अशी टीका करत जयसिंह मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या कारवाईला उत्तर दिलं आहे. पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांवर कोणती कारवाई केली? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष होताना कोणती कारवाई झाली? दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कोणती कारवाई केली, असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केला.
आधी या सर्वांवर कारवाई करा मग आमच्यावर कारवाई करा असं उत्तर जयसिंह मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यानी भाजपला मतदान केल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी ही कारवाई केली.
स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे सर्व सदस्य माळशिरस तालुक्यातून असून मोहिते-पाटील गटातील आहेत. विशेष म्हणजे निलंबन झालेल्या सहा सदस्यांपैकी दोन सदस्य हे मोहिते-पाटील यांच्या कुटुंबातील आहेत.
सोलापुरात राष्ट्रवादीच्या सहा झेडपी सदस्यांचे निलंबन, निवडणुकीत भाजपला साथ दिल्याने कारवाई
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सभागृहात राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सदस्यांना व्हीप बजावण्याची परवानगी मागितली. मात्र पीठासीन अधिकार्यांनी सभागृहात व्हीप बजावता येत नसल्याचे सांगितल्या नंतरही उमेश पाटील यांनी पक्षादेश सभागृहात वाचून दाखवला. मात्र हा आदेश झुगारत मोहिते-पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजप समविचारी आघाडीला पाठिंबा दिला. याच पाठिंब्यावर भाजप समविचारी आघाडी जिल्हा परिषदेमध्ये विजयी झाली. पक्षादेश डावलून समर्थन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षातर्फे पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.