Solapur News : सध्या उन्हाची (Heat) तीव्रता वाढू लागल्याने त्याच्या झळा आता लहानलहान मुलांनाही बसू लागल्या आहेत. शाळेची वेळ कमी करा, अशी मागणी आता मुले करू लागली आहेत. मुलांचे हाल पाहून उबाठा युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे (Ganesh Ingale) यांनी जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे. 


एका बाजूला उन्हाच्या जाळ्यांनी अंग भाजून निघत असताना सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची वेळ ही सकाळी साडे सात ते साडे बारा वाजेपर्यंत करण्यात आली आहे .जिल्हा परिषद शाळेमध्ये गरीब शेतकऱ्यांची मुले चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पायी चालत शाळेकडे येत असतात. साडे बारा वाजता शाळा सुटल्यानंतर ह्या मुलांना भर उन्हात चालत पायपीट करत घरी जावे लागते.


चिमुरड्यांची प्रशासनाकडे आर्त हाक


सध्या बारा वाजेनंतर उन्हाची तीव्रता भयंकर वाढली असून सूर्य आग ओकात आहे. यामुळे शाळकरी मुलांना उन्हाचे चटके सोसत घरी जावे लागते. या आग ओकणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांना चक्कर येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे युवा सेनेच्या वतीने अकलूजचे प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांना शिवसेना युवा सेनेच्या वतीने निवेदन देऊन शाळेची वेळ साडे सात ते साडे अकरा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा युवा सेनेच्या वतीने शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे. तर शाळेची वेळ कमी करा, अशी आर्त हाक विद्यार्थ्यांनी डोक्यावर दप्तर ठेऊन केली आहे. 


नाशिकमध्ये उष्माघात कक्ष स्थापन 


दरम्यान, नाशिकमध्ये उन्हाचा तडाका वाढल्याने जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. महापालिकेच्या दोन रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 बेड उष्माघाताचे आरक्षित करण्यात आले असून जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये दहा बेड उष्माघाताचे रुग्णांसाठी आरक्षित करून उपयुक्त औषध साठा देखील दिला रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  


मुंबईत उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता


मुंबईतील सांताक्रुज हवामान केंद्रावर 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर कुलाब्यात देखील 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान काल नोंदविण्यात आलंय. पुण्यात तपमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर गेलाय. तर रत्नागिरीत देखील 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असून आज मुंबईत उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता आहे. परिणामी, संभाव्य उष्णतेच्या लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रादेशिक हवामान विभाग(IMD) आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



आणखी वाचा 


Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?