सोलापूर : स्वतःचा मुलगा, नातू आणि सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार वृद्ध महिलेने केलीय. सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेच्या फिर्यादवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे यांच्यासह अन्य दोघांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


फिर्यादी भंगरेवा यांचे पती महादेव बागदुरे यांचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे. मृत्यू पूर्वी महादेव बागदुरे यांनी आपल्या पत्नीचा नावे 70 लाख रुपयांची ठेव ठेवली होती. तसेच पत्नी आणि स्वत:च्या नावाने काढलेल्या जाँईट अकाऊंटमध्ये 20 लाख रुपये ठेवले होते. मात्र कोणत्याही समंतीविना मुलगा, नातू तसेच दोन सुना यांनी बनावट कागपत्रे तयार करून परस्पर सर्व ठेवी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. तसेच 150 तोळ्याहून अधिकचे सोने, 50 तोळे चांदी आणि इतर मौल्यवान वस्तु, खतावणी तसेच काही कागदपत्रे देखील काढून घेतल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे.


"नातू राकेश बागदुरे याने रात्री झोपलेले असताना उठवून माझी स्वाक्षरी घेतली. बँकेत असलेल्या पैशाच्या व्याजाची वाटणी करायची आहे असे मला सांगण्यात आले. त्यामुळे खोटे सांगून माझी फसवणुक करण्यात आली. तसेच जवळपास 150 तोळे सोने देखील काढून घेऊन सुनांनी स्वत:साठी दागिने बनवून घेतले आहेत." असा आरोप तक्रारदार महिला भंगरेवा बागदुरे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.


तर फिर्यादी वृद्ध महिलेच्या पतीने ठेवी एका सहकारी पतसंस्थेत ठेवल्या होत्या. त्यामुळे फिर्य़ादीच्या समंतीविना पतसंस्थेने हे पैसे इतरांना कसे दिले या बाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासानुसार बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन हे पैसे खात्यातून काढल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. सखोल चौकशीनंतर अधिकची माहिती पुढे येईल अशी प्रतिक्रिया विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.


या प्रकरणात आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे, सून राजश्री बागदुरे, सून शारदा बागदुरे यांच्यासह राकेश याचा मित्र माशाळ आणि नातेवाईक शिवानंद नागणसुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांदवि कलम 394, 465, 467, 471, 420, 506, 34 या प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 6 आरोपींपैकी 5 जणांना पोलिसांनी अटक देखील केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.