रत्नागिरी : शहरांमध्ये इमारतीच्या टेरेसवर मुलांचं खेळणं काही नवीन नाही. मोठ्या संख्येनं मुलं या ठिकाणी खेळताना आपणाला सर्रास दिसून येतात. त्यामुळं पालक देखील निश्चिंत असतात. असं असलं तरी पालकांनी आता अधिक सतर्क होण्याची आणि मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण, रत्नागिरी शहरातील जुनामाळ नाका येथील तारा पार्क येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या टेरेसवर खेळताना एका 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


कनिका चुनेकर असं या मुलीचं नाव आहे. कनिका टेरेसवर खेळत असल्यानं तिची आई देखील निश्चिंत होती. पण, त्यानंतर कनिकाची गडबड कुठं जाणवली नाही. शिवाय, बराच वेळ देखील झाला होता. त्यामुळे आई कनिकाला पाहण्यासाठी टेरेसवर गेली. त्यावेळी समोरचं दृश्य पाहून तिला धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर लगेच कनिकाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, यावेळी खूप उशिर झाला होता. डॉक्टरांनी 11 वर्षाच्या मुलीला मृत घोषित केलें. दरम्यान, असं असलं तरी 11 वर्षाच्या कनिकाचा मृत्यू नेमका कशानं झाला? त्यावेळी नेमकं काय घडलं? असे सवाल देखील उपस्थित केले जाऊ लागले. यावेळी उठलेल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ही पोस्ट मॉर्टेम अहवालानंतरच समोर येणार आहे.


काय आहे पोस्ट मॉर्टेमचा अहवाल?


कनिकाला रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, सकाळी सहा वाजता तिचा पोस्ट मॉर्टेम झालं. त्यानंतर आलेल्या अहवालामध्ये पलमोनरी इडिमा अर्थात फुप्फुसाला सुज आल्यानं कनिकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. फुप्फुसाला सुज येण्याची अनेक कारणं देखील आहेत. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल लाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर देखील याबाबत केमिकल अॅनालिसिस किंवा व्हिसेराचा रिपोर्ट देखील केला जाणार आहे. याबाबतचा अहवाल हा एक ते दोन दिवसात मिळणं अपेक्षित आहे. पण, या साऱ्या घटनेमुळं सर्वत्र हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.


पलमोनरी इडिमा म्हणजे काय?


अगदी आपल्याला कळेल अशा शब्दात सांगायचं झालं तर फुप्फुसाला सुज येणे म्हणजे पलमोनरी इडिमा होय. फुप्फुसाला सुज ही साधारण मार लागल्यानं, फुप्फुसावर आघात झाल्यानं देखील येऊ शकते. शिवाय, फुप्फुसाला सुज येण्याची अनेक कारणं आहेत.


पालकांनो काळजी घ्या!


रत्नागिरीतील घटना दुर्दैवी आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळं पालकांनी देखील मुलांच्याबाबत अधिक सतर्क होणं गरजेचं आहे. आपली मुलं कुठं काय करतात? त्यांच्या हालचालींकडे अधिक लक्ष असणं, त्यांच्याबाबत अधिक सतर्क होणं गरजेचं आहे हे नक्की!