Solapur News : आमदार प्रणित शिंदे (Praniti Shinde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, 'अजितदादा काय म्हणाले मला माहिती नाही मात्र सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काय केले हे सर्व सोलापूरकरांना माहिती आहे. उजनीची पाईपलाईन शिंदे साहेबांनी आणली. त्यातूनच येणाऱ्या दोनशे वर्षे सोलापूरकर पाणी पिणार आहेत.' तसेच सोलापूरला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी भाजपवरी टीका केली आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली होती की, सोलापूर जिल्ह्यात एकाचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं. मात्र तरीही त्यांना पाण्याचा प्रश्न कायम आहे. अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे की, 'सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काय केलं हे सोलापूरकरांना माहित आहे. ज्यावेळी सोलापूरसाठी पाण्याचा कोणताही स्त्रोत नव्हता त्यावेळी शिंदे साहेबांनी तो मिळवून दिला.'


प्रणिती शिंदे नवनीत राणांविरोधात लढणार? 
खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आमदार प्रणिती शिंदे यांनी अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढावी, अशी मागणी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. याला उत्तर देत त्यांनी सांगितलं आहे की, 'ही काही लोकांनी पसरवलेली अफवा आहे. याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही.'


'आम्हांला घोडेबाजार करायची गरज नाही'
आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकांवर वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'आम्हाला घोडेबाजार करायची गरज नाही. आमच्याकडे आकडे आहेत. आम्ही कशाला घोडेबाजार करु? भाजपने त्यांचा उमेदवार मागे घ्यायला हवा होता. मात्र त्यांना एवढा ओव्हर कॉन्फिडंस कसा आला मला माहिती नाही. पण मविआचे आकडे आणि उमेदवार सुरक्षित आहेत. 


'मोदी सरकारकडून जातीपातीचं राजकारण'
काश्मीर पंडित स्थलांतर मुद्दयावर प्रतिक्रिया देत त्यांनी म्हटलं आहे की, 'मोदी सरकारकडून जातीपातीचे राजकारण होत आहे. महागाई किंवा भाववाढ कमी व्हायचे सोडून रोजगार कमी झालेत.  देश जॉबलेस नव्हे तर जॉब लॉस झालाय. आणि तुम्ही म्हणताय जीडीपी वाढतोय. मात्र देशात दोन लोकांमुळे जीडीपी वाढतोय (अदानी, अंबानी) आणि सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाहीत. जेव्हा देशावर आर्थिक संकट येतात तेव्हा मोदी सरकारकडून जातीपातीचं राजकारण केलं जातं. हे फक्त दिशाभूल करण्यासाठी आहे.'