सोलापूर : एकीकडे सोलापुरात कोरोनाबाधितांची आकडे रोज वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना नसलेल्या रुग्णांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात असाच काहीसा अनुभव रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आला. आजाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णांवर तात्काळ उपचार न केल्याने त्यांना ताटकळत उभं राहावं लागलं. या सहकारी रुग्णालयात रुग्णांना दाखल न करुन घेता त्यांना बाहेरच ठेवण्यात आलं. यावेळी रुग्ण हॉस्पिटलच्या परिसरात जमिनीवर झोपून होते.
ही बाब प्रशासनाच्या लक्षात येताच महापालिका उपायुक्त पंकज जावळे हे तात्काळ संबंधित रुग्णालयात दाखल झाले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली कैफियत उपायुक्तांसमोर मांडली. काही रुग्णांना कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आलेले असताना देखील रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेतले नाही, असा आरोप करत रुग्णांच्या नातेवाईंकानी आपली वेदना व्यक्त केली. उपायुक्त पंकज जावळे यांनी रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. त्यामुळे उपायुक्तांनी तात्काळ याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.
सोलापुरात कोरोनाची सुरुवात झाल्यापासून शासकीय रुग्णालया व्यतिरिक्त इतर कुठेही उपचार मिळत नसल्याची तक्रार वारंवार नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील 28 रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. एका रुग्णालयाने या बाबत खुलासा न केल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे. सोबतच सोलापुरात रुग्णालय सुरु आहेत का किंवा ते नागरिकांना व्यवस्थित सेवा देत आहेत का हे तपासण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काडून सर्व रुग्णांवर उपचार करण्यास सांगितले आहे. मात्र तरी देखील या रुग्णालयाकडून त्या आदेशाचे उल्लंघन करण्यात येत होती.
नागरिकांकडून दोन तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उपायुक्त आणि प्रशासकीय अधिकारी या रुग्णालयात दाखल झाले. संबधित रुग्णांच्या नातेवाईकांशी बातचीत करुन अधिकचे तपशील जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे उपायुक्त पंकज जावळे यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयांना रुग्णांना वैद्यकीय सेवा योग्य पद्धतीने आणि वेळेत पुरवण्याची विनंती देखील केली.