सोलापूर: एका हायप्रोफाईल खून खटल्याचा तपास लावण्यात सोलापूर शहर पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या महिला डॉक्टरचा खुद्द डॉक्टर पतीनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मारेकरी डॉक्टरच्या प्रेयसीसह चार प्रतिथयश डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी हा क्लिष्ट खून खटला उघडकीस आणला. दहा महिन्यापूर्वी घडलेल्या या हायप्रोफाईल खुनाचा कसा लागला तपास ?
हायप्रोफाईल खुनाचा कसा लागला तपास ?
सोलापुरातील नामवंत डॉक्टर एस. प्रभाकर याचं गंगामाई हॉस्पिटल. सध्या हे सुसज्ज रुग्णालय पोलिसांच्या रडारवर आहे. याच रुग्णालयात कार्यरत असणारा मेंदूरोग तज्ञ डॉ. प्रसन्ना अग्रहार याचा पोलीस शोध घेत आहेत. डॉक्टर प्रसन्नवर आपल्याच डॉक्टर असलेल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. गंगामाई हॉस्पिटलच्या अन्य तीन डॉक्टरांना सुद्धा या खून खटल्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. सर्वांनी मिळून डॉक्टर रश्मी अग्रहार हिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
९ जुलै २०१५ रोजी खून
९ जुलै २०१५ रोजी राहत्या घरी रश्मीचा खून झाला. पण डॉ. प्रसन्ना यांनी पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगून त्यांच्याच रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी ना पोलिसांना खबर दिली, ना शवविच्छेदन केलं. प्रसन्न यांनी स्वतः मृत्यू प्रमाणपत्र तयार करून अंत्यविधी उरकला.
डॉक्टर प्रसन्नचे मूळच्या बंगाली असलेल्या मेघ रॉय चौधरी हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्याला डॉक्टर पत्नी रश्मीने विरोध केला होता. दोघांनी मिळून रश्मीचा खून केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झाला.
चार डॉक्टरांविरोधात गुन्हा
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. एस. प्रभाकर, डॉ. प्रसन्न अग्रहार, डॉ. अमित कुलकर्णी, डॉ. भाऊसाहेब गायकवाड आणि प्रेयसी मेघ रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर पत्नी रश्मी अग्रहारचा खून करणं, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणं, कट रचून खून करणं आणि पोलिसांची दिशाभूल केल्याचा ठपका गंगामाई रुग्णालयाच्या डॉक्टरांवर ठेवण्यात आला आहे.
स्वत: पोलीस आयुक्तांचा पुढाकार
अगोदरच्या दोन अधिकाऱ्यांना तपासात अपयश आल्यावर खुद्द पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या विशेष टीमलासोबत घेऊन या घटनेचा पर्दाफाश केला.
पाचही आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत. गेल्या दहा महिन्यापासून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न चालू होते. कुठलेच धागेदोरे मिळत नव्हते.
आपण केलेला खून पचला अशी धारणा या आरोपींची झाली होती. मात्र पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी तपासाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि दहा दिवसात या अतिशय किचकट बनलेल्या खुनाचा उलगडा झाला.