सोलापूर : काल झालेल्या पदवीधर मतदान प्रक्रियेदरम्यान सोलापूरचे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी हे पंढरपूर शहरातील द ह कवठेकर प्रशालेत एक मतदान केंद्रात गेल्याने राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. काल या मतदान केंद्रावर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असताना खासदार जय सिद्धेश्वर स्वामी थेट एक मतदान केंद्रात घुसल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी घेतला आहे.


वास्तविक आदर्श आचारसंहितेच्या नियमानुसार मतदान प्रक्रियेतील कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी, निवडणूक निरीक्षक व मतदार याशिवाय कोणालाही निवडणूक केंद्रात जाण्याची परवानगी नसताना भाजप खासदार थेट मतदान केंद्रात गेले होते. यावर आक्षेप घेताच आपणास मतदान केंद्रास भेट देऊन योग्य पद्धतीने मतदान सुरू आहे का? हा पाहण्याचा अधिकार असल्याचा दावा खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे. मतदान शांततेत चाललं आहे का नाही, मतदान केंद्रांवर कोविडचं पालन होतंय की नाही हे पाहण्याचा अधिकार आहे, असं खासदार जय सिद्धेश्वर स्वामींनी म्हटलं आहे. दुसरीकडे आज राष्ट्रवादीच्या वतीने सोलापूर येथे लेखी तक्रार दिली जाणार आहे.


विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पूर्ण, महाविकास आघाडी की भाजप? भवितव्य मतपेटीत बंद


पाच जागांसाठी काल झालं मतदान


विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडली. काल सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. तर उद्या, 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या मतदानाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.


महाविकास आघाडीचे उमेदवार
महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार रिंगणात आहेत.


अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांड देशपांडे, शिवसेना
पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे शिक्षक मतदारसंघ - प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी, काँग्रेस

भाजपचे उमेदवार
तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे. या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार कोण हे जाणून घेऊया


अमरावती शिक्षक मतदारसंघ - डॉ. नितीन धांडे
पुणे पदवीधर मतदारसंघ - संग्राम देशमुख
पुणे शिक्षक मतदारसंघ - जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोरनाळकर
नागपूर पदवीधर मतदारसंघ - संदीप जोशी