Maharashtra Weather: राज्यात सध्या पहाटे हलका गारवा आणि दुपारी उकाड्याचा ताप वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका (Temperature) प्रचंड वाढलाय. किमान व कमाल तापमान वेगाने वाढत असून गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 37.5 अंश तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या 3 दिवसांत हळूहळू कमाल तापमान वाढणार आहे.कोरडे व शुष्क हवामान राहणार असून नागरिकांना प्रचंड उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.(IMD Forecast)
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांत, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील मैदानी भागांत किमान तापमान 1 ते 3 अंशांनी घटले आहे. तर, बिहार आणि गंगेच्या पश्चिम बंगालमधील काही भागांत 1 ते 2 अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद झाली असून 1.6-3.0 अंशांनी वाढलेले होते.मध्य भारतात तापमान पुढील 24 तासांत 1 ते 3 अंशांनी कमी होईल, त्यानंतर 4 दिवसांत 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 13 फेब्रुवारी रोजीच्या नोंदीनुसार, काही भागांत कमाल तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचले असून, रात्रीच्या तापमानातही चढ-उतार दिसत आहे.
कुठे काय होते तापमान?
सातारच्या कराड येथे राज्यातील सर्वाधिक 40.3°C तापमान नोंदवले गेले. नंदुरबारच्या शहादा येथे 39.0°C, पुण्यातील राजगुरुनगर 38.4°C, लोनावळा 38.2°C, सोलापूर 38.5°C आणि चंद्रपूर 37.8°C तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 35°C पेक्षा जास्त आहे. कोकणातही तापमानाचा चढा कल दिसून आला. रत्नागिरी येथे 33.7°C, पालघर येथे 35.1°C, तर कोल्हापूरमध्ये 34.2°C तापमान नोंदले गेले.
किमान तापमान कसे होते?
राज्यातील काही ठिकाणी गारठा कायम असून, नाशिकमधील कलवण येथे किमान तापमान 12.0°C इतके नोंदवले गेले. लातूर, कोल्हापूर, मुंबई आणि पुण्यात रात्रीचे तापमान तुलनेने जास्त होते. राज्यात पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता असून, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आर्द्रता जास्त असल्याने उष्णता अधिक जाणवणार आहे.
हेही वाचा: