सोलापूर (Solapur Lockdown ) : सोलापूरच्या ग्रामीण भागात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनदरम्यान मेडिकल, कृषी विषयक साहित्याची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे. सोलापूर शहर हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्बंध लागू होणार आहेत. 21 मे सकाळी 7 ते 1 जून सकाळी 7 पर्यंत ग्रामीण भागात कडक निर्बंध असतील. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 


किराणा दुकान, भाजी मंडई, कृषी उत्पन्न बाजार समिती, इतर सर्व व्यवसाय 10 दिवसांसाठी पूर्णतः बंद असतील. मात्र किराणा माल, भाजीपाला, पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ सकाळी 7 ते 11 वेळेत घरपोच सेवा देण्यास मुभा असेल, अशी माहिती सोलापूरची जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. 


सोलापूर ग्रामीण भागांतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर शहर हद्द वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश जारी केले आहेत. सोलापूर ग्रामीण भागात शुक्रवार दिनांक 21 मे सकाळी 7 पासून ते 1 जून 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.


सोलापूर शहरापेक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद केली जात आहे. तसेच सरासरी 35 ते 40 जणांचा मृत्यू होत आहे. अशातच सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळेच सध्या जे निर्बंध आहेत त्यात वाढ करण्याचा निर्णय ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. 


राज्यात मंगळवारी नवीन कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, तर तब्बल 48 हजार रुग्णांना डिस्चार्ज


राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. मंगळवारी तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर काल नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान काल 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 54,05,068 इतका झाला असून 48,74,582 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 82 हजार 486 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.