सोलापूर : सोलापूर शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करतंय मात्र दुसरीकडे कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. सोलापूर शहरात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाण बरेच घटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, असे असले तरी बाधित रुग्ण आढळण्याचे कमी झालेले नाही. तर मृतांच्या संख्येत देखील कोणतेही घट झालेली नाही. त्यामुळे शहरात कोरोनाची परिस्थिती अद्याप ही चिंताजनकच आहे असे म्हणावे लागेल.


सोलापूर शहरात ऑगस्ट महिन्यात अँटिजन आणि स्वॅब मिळून 25 हजार 534 चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यामधून 1645 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालं. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर हा 6.44 टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात सोलापूर शहरात 45 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शहराचा ऑगस्ट महिन्याचा मृत्यूदर हा 2.72 टक्के इतका होता. सप्टेंबर महिन्यात परिस्थिती नियंत्रणात येण्याची अपेक्षा होती. वास्तवात मात्र तसे होताना दिसत नाही. 29 सप्टेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात रुग्ण पॉझिटिव्ह येण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


सप्टेंबर महिन्यात सोलापूर शहरात चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. ऑगस्ट महिन्यात 25 हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र सप्टेंबर महिन्यात केवळ 15 हजार 307 संशयितांचे नमुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचण्या कमी झाल्या तरी बाधित रुग्णांची संख्या मात्र जास्त आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 1700 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चाचण्या कमी आणि रुग्णांची संख्या जास्त असल्याने पॉजिटिव्ह येण्याचे दर हे 11.10 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण देखील जास्त आहे. ऑगस्टमध्ये 45 रुग्णांचा मृत्यू झाला होता तर सप्टेंबर महिन्यात 29 तारखेपर्यंत 54 जणांनी आपला जीव गमावला आहे. सोलापूर शहराचा सप्टेंबर महिन्याचा मृत्यूदर हा 3.17 टक्के इतका आहे.


राज्याप्रमाणे शहरात अनलॉक होत असल्याने शहरात नागरिकांचा वावर वाढला आहे. त्याचप्रमाणे या महिन्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन वगैरे झाले आहेत. या ठिकाणी नागरिकांचे सामुहिक येण्याचे प्रमाण हे अधिक आहे तर या ठिकाणी सोशल डिस्टन्सच्या नियमांची देखील व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचं निर्दशनास येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान "शहरात पूर्वीपेक्षा परिस्थिती नियंत्रणात आहे. शासनाच्या नियमांनुसार ज्यांना आवश्यकता आहे. त्यांचीच चाचणी केली जात असल्याने चाचण्यांची संख्या घटली आहे. मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेत नव्याने उपायुक्त म्हणून नियुक्त झालेले जमीर लेंगरेकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता शासकीय नियमांचे पालन करावे" असे आवाहन मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले.


सोलापूर शहरातील कोरोनाची स्थिती


महिना               एकूण चाचण्या           पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या       मृत्यू


एप्रिल                      1702                          105                                       6


मे                          6656                          841                                       89


जून                       5604                        1448                                      166


जुलै                       22335                       2676                                     113


ऑगस्ट                 25534                       1645                                      45


29 सप्टेंबरपर्यंत      15307                        1700                                      54


सोलापूर जिल्ह्यात आज (मंगळवारी) प्राप्त अहवालानुसार 352 रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर आज जिल्ह्यात 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 33 हजार 084 रुग्ण हे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 142 रुग्णांचा दु्र्देवी मृत्यू देखील झाला. आज दिवसभरात जिल्ह्यात 341 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 24 हजार 655 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित 7 हजार 287 जणांवर उपचार सुरु आहेत.


संबंधित बातम्या :