Solapur : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Solapur District Collector Kumar Ashirwad) यांनी आज माढा तालुक्यातील उंदरगाव. केवड, वाकाव या पूरग्रस्त गावांचा दौरा केला. ज्या ठिकाणी जाणं अशक्य होतं अशा ठिकाणी थेट ट्रॅक्टरमध्ये बसून ग्रामस्थांसमवेत आशीर्वाद यांनी बांधा बांधावर जाऊन पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 88 गावांना या महापुराचा फटका बसला असून उभी पिके पूर्णपणे आडवी झाली आहे. अनेक ठिकाणी जमिनीची माती खरवडून वाहून गेलेली आहे या सर्व शेतीचे पंचनामे सध्या सुरू असून आठ ते नऊ ऑक्टोबर पर्यंत हे पंचनामे पूर्ण केले जाणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यात जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट

सोलापूर जिल्ह्यात जवळपास साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके संपून गेली असून आता पंचनामे झाल्यावर नेमका आकडा समोर येईल असे त्यांनी सांगितले. केवड सारख्या गावात 20-20 फूट जमिनीला खड्डे पडले असून अशा ठिकाणी या शेतकऱ्याचे पुनर्वसन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या पूरग्रस्त गावातील बाधित नागरिकांना धान्य, दहा हजार रुपयांची रोख मदत आणि पशुपालकांसाठी चारा व मुरघास याचे वाटप सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 521 बाधित पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढले

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 521 बाधित पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. वेळीच मदत पोहोचल्याने सोलापूर जिल्ह्यात एकही जीवितहानी झाली नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. सध्या चारा व मुरघास हा मोठ्या प्रमाणात संभाजीनगर सांगली कोल्हापूर पुणे या भागातून येत असून पशुपालकांना कुठेही चारा कमी पडणार नाही याची हमी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यासोबत मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. सरकारनं आम्हाला तातडीने मदत करावी, आमचे पुनर्वसन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. 

Continues below advertisement

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या वेदना सांगितल्या

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या वेदना सांगितल्या. आमचं पूनर्वसन करावं अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. आमच्या जमिनी पूर्णत खरवडून गेल्या आहेत. 15 ते 20 फुटांचे खड्डे जमिनीला पडले आहे. त्यामुळं यातून काही उत्पादन येण्याची अपेक्षाच नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सरकारनं आम्हाला तोकडी मदत न करता भरीव मदत करावी, या संकटातून बाहेर काढावं अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.