Solapur: जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान उद्या देहू येथून होत असून यासाठी अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज हा अश्व आज पालखी सोहळ्याकडे रवाना झाला आहे. गेले 35 ते 40 वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावत असतो. मोहिते पाटलांचा हा पताकाधारी अश्व बलराज गेली चार वर्ष जगद्गुरुंच्या सेवेत आहे. बलराज हा मारवाड जातीचा आणि सर्व शुभ लक्षण असणारा देखणा अल्बक आश्व असून गेली पाच वर्ष तो जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणामध्ये पताकाधारी अश्व म्हणून धावत आलेला आहे. आजवर बलराजकडून कोणत्याही भाविकाला कसलीही इजा झालेली नाही. हजारोंच्या गर्दीतही शांतपणे राहणारा हा बलराज पाचव्या वर्षी आता जगद्गुरूंच्या रिंगण सोहळ्यात धावणार आहे. 

Continues below advertisement

वर्षभर खास खुराक, तेल मालिश अन् प्रशिक्षण

यासाठी वर्षभर बलराजला रिंगण सोहळ्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याशिवाय हजारो भाविकांसोबत चालावे लागत असल्याने त्यासाठीचेही विशेष प्रशिक्षण बलराजला देण्यात आले आहे.  यासाठी त्याला वर्षभर हरभरा, गुळ, दुध, तूप, गव्हाचा भूस्सा असा खास खुराक दिला जात होता. आषाढी वारीसाठी रवाना होण्यापूर्वी महिनाभर आधी या खास खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन व कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक पहात असतात .बलराजची तेलाने मालिश करुन सर्वांग तगडे केले जाते. त्याचबरोबर गोल रिंगणाकरीता धावण्याचं प्रशिक्षणही देण्यात येते.

रिंगण सोहळ्यासाठी मोहिते पाटलांचा घोडा सज्ज

आषाढी वारीसाठी रवाना झालेला बलराज अश्व हा महाराणा प्रताप यांच्याकडे असलेल्या अश्व चेतक याच्या रक्त गटातील आहे. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्यासाठी बरोबर डॉक्टर व 5 जणांची प्रशिक्षक बलराज सोबत रवाना झाले आहेत . वारीच्या वाटेवर त्याला हिरवा चारा, गहु भुस्सा, दूध, तूप, हरभरा, गुळ असा खुराक सोबत देण्यात आला आहे.  देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारा जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी देहुच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वाच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 40 वर्षांपूर्वी सुरु केला. त्यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या आई पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली.

Continues below advertisement

हेही वाचा:

Ashadhi Wari 2025 : यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी, पंढरपूर पालखी मार्गावर टोल नाही; टोलमाफीचे स्टिकर्स मिळवण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय?