सोलापूर : सोलापुरात कोरोनाचा विळखा घट्ट होतोय. जिल्ह्यात दररोज जवळपास 25 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होतोय. तर दररोज 1 हजारहून अधिक बाधितांची भर पडतेय. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या चार दिवसात पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. विविध विभागात काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूमुळे  जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी काही जणांचे वय हे अवघे 35 ते 40 च्या दरम्यान आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न धान्य वितरण विभागात काम करणाऱ्या बापूय्या स्वामी यांचं 9 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांचं वय 45 वर्ष होतं. अन्न धान्य वितरण विभागात अव्वल कारकून म्हणून ते कार्यकर होते. बापूय्या स्वामी यांना 1 एप्रिल रोजी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, एक दिवसानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 9 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. बापूय्या स्वामी यांना अवघ्या 11 आणि 7 वर्षाच्या दोन मुली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. 


जिल्ह्याच्या कृषी विभागात आंधळगाव मंडळातील मारापूर मुख्यालयाचे कृषी साहायक असलेल्या प्रशात कोळी यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. 17 एप्रिल रोजी प्रशांत कोळी यांचा मृत्यू झाला. प्रशांत कोळी हे अवघ्या 37 वर्षांचे होते. तर कृषी विभागात दुसऱ्या दिवशी आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कार्यालयात कृषि पर्यवेक्षक असलेल्या अशोक कुंभार यांचा देखील कोरोनाने बळी घेतला. अशोक कुंभार हे 56 वर्षांचे होते. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत शिपाई पदावर काम करणाऱ्या अण्णासाहेब साबळे यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला. 18 एप्रिल रोजी साबळे यांची प्राणज्योत मालवली. अण्णासाहेब साबळे अवघ्या 35 वर्षांचे होते. जवळपास 18 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. 6 मार्च रोजी छातीत दुखत असल्याने साबळे यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. एका दिवसाच्या उपचारानंतर ते घरी देखील परतले. मात्र, 1 एप्रिल रोजी साबळे यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. साबळे यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या उपचाराकरिता राज्य महसूल कर्मचारी संघटनेने देखील मदत केली. सोसायटी मधून देखील त्यांना उपचाराकरिता कर्जाची उपलब्धता करुन दिली. मात्र, सर्वांचे हे शर्तीचे प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. अण्णासाहेब साबळे हे 2005 साली अनुकंपावर महसूल विभागात रुजु झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 बहिणी, 8 वर्षाची मुलगी आणि अवघ्या 6 वर्षचा मुलगा आहे. 


मंगळवारी 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक असलेल्या राजेंद्र वेदपाठक यांचा वयाच्या 54 व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला. सैन्यात सेवा बजावल्यानंतर राजेंद्र वेदपाठक हे निवृत्तीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून रुजु झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील त्यांना 7 ते 8 वर्षे सेवा बजावली. मात्र, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. तर उत्तर सोलापुरातील कवठे गावात कोतवाल असलेल्या उद्धव राजपूत यांचा देखील काल कोरोनाने बळी घेतला. काही दिवसांपूर्वी राजपूत यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.