सोलापूर : शेतकऱ्यांना आपण जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणतो. पण सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय. अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांच्या घराचं, पिकांचं आणि त्याचबरोबर जमिनींचं मोठं नुकसान झालंय. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला सप्टेंबर महिन्यात महापूर आला होता. या पुरात शेतकऱ्यांची पिकं तर वाहून गेलीच, पण जमिनी देखील वाहून गेल्या आहेत. जमिनीला 10 ते 15 फुटाचे खड्डे पडलेत. नदीने पाण्याचा प्रवाहच बदलल्यानं सगळं होत्याचं नव्हतं झालं आहे. दरम्यान, या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मायेचा आधार देण्यासाठी मातीशी घट्ट नाळ असलेले काही अधिकारी पुढे आले आहेत. अतिवृष्टी, पूरग्रस्त तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना या अधिकाऱ्यांना लाखो रुपयांची मदत केली आहे.
समाजाच आपण काहीतरी देणं लागतो. आपली नाळ या मातीशी, शेतकऱ्यांशी घट्ट आहे हे अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मुळचे बार्शी तालुक्यातील महागावचे सुपुत्र IAS रमेश घोलप सर. सध्या ते झारखंडमध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर माढा तालुक्यातील उंदरगावमधील तहसीलदार विशाल नाईकवाडे सर. ते सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कार्यरत आहेत. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त मा.योगिता कोल्हे यांनी शेतकऱ्यांना लाखो रुपयांची मदत केली आहे. या काळात शेतकऱ्यांनी खचून न जाता, या संकटावर मात करण्याची प्रेरणा अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपलं कर्तव्य करत असताना आपल्या गावातील, आपल्या शेतातील कष्टकरी, कामगार, मजूर, व्यवसायिक अडचणीत आलेत, या भावनेत या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली आहे.
IAS रमेश घोलप : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून तीन महिन्यांचा पाच लाख रुपये पगार दिला
रमेश घोलप हे एका सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व. पण स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. ते सध्या झारखंडमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून तीन महिन्यांचा पाच लाख रुपये पगार दिला आहे. रमेश घोलप यांनी बार्शी तालुक्यातील कारी व दहीटणे या गावांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सपत्नीक भेट देऊन त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. त्याचबरोबर आणखी 30 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10-10 हजार रुपयांची मदत त्यांनी केली आहे. असे त्यांना पाच लाख रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले आहेत.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार
कारी गावातील शेतकरी कुटुंबातील मयत गंभीरे जी यांची कन्या दुर्गा हिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार केलेला आहे. भविष्यात कोणत्याही कठीण काळात हक्काने फोन करण्यास त्यांना सांगितले आहे. स्वप्नांचा पाठलाग करत असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही मदत फिक्स डिपॉझिट स्वरूपात तिच्या नावावर जमा करून अभ्यासाच्या काळात त्याचा वापर करण्याचा सल्ला दिला असल्याचे घोलप म्हणाले. दहीटणे गावातील मयत शेतकरी लक्ष्मणजी गवसाने कुटुंबातील मुलगा–मुलीच्या शिक्षणासाठी देखील एक लाख रुपयांची सहाय्य सुपूर्द केले.
तहसीलदार विशाल नाईकवाडे : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांची मदत
विशाल नाईकवाडे हे मुळ माढा तालुक्यातील उंदरगावमधील आहेत. पण ते सध्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. सीना नदीला महापूर आल्यामुळं माढा तालुक्यातील 20 ते 22 गावांचं मोठं नुकसान झालं आहे. शेती, घरं पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि त्यांचे बंधू विकास नाईकवाडे यांनी अन्नधान्याचे कीट, त्याचबरोबर चादर, रोख स्वरुपात रक्कम तसेच सॅनिटरी पॅड, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अशी मिळून एकूण 3 लाख रुपयांची मदत केली आहे. त्यांनी पूरग्रस्त असलेल्या उंदरगाव, केवड, वाकाव, वडशिंगे याभागातील शेतकऱ्यांना मदत केली आहे. त्याचबरोबर आरोग्याची सेवा देखील दिली आहे.
विशाल नाईकवाडे आणि विकास नाईकवाडे यांनी वडील स्वर्गीय अरुण आबा नाईकवाडे यांच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात म्हणून अरुणोद्यय फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. सामाजिक कामात विशाल नाईकवाडे आणि विकास नाईकवाडे कायम अग्रेसर असतात. विशाल नाईकवाडे हे नोकरीसाठी नाशिक जिल्ह्यात असून देखील त्यांनी आपल्या गावाची नाळ कधीही तुटू दिली नाही. संकटाच्या काळात ते स्वत: गावात आले आणि शेतकऱ्यांना गरजू कुटुंबांना मदत केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त योगिता कोल्हे : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी रोख चार लाख रुपयांची मदत
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त योगिता कोल्हे मॅडम यांच्या संकल्पनेतून माढा तालुक्यातील उंदरगाव व परिसरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना जवळपास 200 कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची रोख रक्कम दिली आहे. तसेच अन्नधान्य किट, कपडे, शालेय साहित्य, सॅनिटरी पॅड, इत्यादी स्वरूपात देखील भरघोस प्रमाणात मदत केली आहे. कोल्हे यांच्या टीमने गरजू लोकांना त्यांच्या घरी जाऊन मदत केली आहे. त्याचबरोबर धान्याचे किट देखील घरी जाऊन दिले आहे. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे नागरिकांना आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या: