Maharashtra Rain : गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. बऱ्यापैकी ठिकाणी पावसानं उघडीप दिली होती. मात्र, आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एन दिवाळीमध्ये मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

Continues below advertisement

पश्चिम उपनगरात मागील 15 ते 20 मिनिटांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड विलेपार्ले या सर्व परिसरात पावसाच्या जोर जास्त आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

पुढील तीन तास महत्वाचे

पुढील 3 तासांत पुणे, रायगड, रत्नागिरी येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

ढगांच्या गडगडाटासह कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस

कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसानं अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला होता. सकाळपासून कडकडीत उन्ह आणि संध्याकाळी पावसाची हजेरी लावली होती.

छत्रपती संभाजीनगर अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस

आधीच अतिवृष्टीमुळे अडचणी सापडलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पैठण आणि वैजापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.

अंबरनाथमध्ये दमदार पाऊस सुरु 

अंबरनाथमध्ये दमदार पाऊस पावसाने दडी मारली होती. उन्हाचा तडाखा वाढला होता गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला होता. आज अचानक कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनासह या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. सखल भागांमध्ये पाणी साचले असून कल्याण अनुपमनगर मधील एका घरावर झाड कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. अंबरनाथ शहर आणि आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

ठाण्यात अवकाळी पावसाला सुरुवात

ठाण्यात विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली आहेत. ठाण्यात ऐन दिवाळीच्या सणांमध्ये पावसात सावट आहे. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची उडाली चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली  आहे.