पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक करावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. बाहेरुन येणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नको, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. परंतु या प्रस्तावाला पंढरपुरातील काही वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. या वारकऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी वारी करा, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
कोरोनाचे संकट पाहता 24 नोव्हेंबर रोजी होणारी कार्तिकी यात्राही आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक करावी. यात्रा कालावधीच्या प्रमुख दिवशी 7 ते 8 लाख लोकांची गर्दी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट येथे केंद्रित झाल्यास कोरोनाचा मोठा धोका होऊ शकेल. यामुळे कार्तिकीला कोणत्याही दिंड्याने अथवा वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश नको, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी 8 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान वारकरी संप्रदायाचे महाराज मंडळींनी काल (18 नोव्हेंबर) मुंबईत विधानसभा सभापती नाना पटोले यांच्याशी चर्चा केली. यामध्ये मर्यादित स्वरुपाच्या यात्रेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वारकरी संप्रदायाचे वतीने सांगण्यात आलं.
दरम्यान राज्यातील मंदिरे उघडली असली तरी कोरोनाचा धोकाही संपलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. आषाढी यात्रेप्रमाणे संचारबंदीमध्ये कार्तिकी यात्रा होणार की नाना पटोले यांच्या मध्यस्थीने मर्यादित स्वरुपात कार्तिकी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
कार्तिकी वारी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करा;सोलापूर जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांचा सरकारला प्रस्ताव